spot_img
spot_img

मंत्रिपद टिकवण्यासाठी प्रतापराव जाधवांचे मेहकरात शक्तिप्रदर्शन; रविकांत तुपकरांची टीका! ‘जिल्हाधिकारी, सीईओंनी पदाची गरिमा राखावी’; प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पक्षीय व्यासपीठावरील उपस्थितीवरून कारवाईचा सवाल!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर येथे पार पडलेल्या दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळाव्यावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रतापराव जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे मंत्रिपद टिकवण्यासाठी आणि पक्षश्रेष्ठींना खूश करण्यासाठी प्रतापराव जाधव यांनी हा मेळावा घेतल्याची टीका तुपकर यांनी केली आहे. यासोबतच पक्षीय स्वरूपाच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.

 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलामध्ये प्रतापराव जाधव यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती असे सांगत आपले मंत्रिपद टिकवण्यासाठी आणि पक्षश्रेष्ठींना खूश करण्यासाठी त्यांनी मेहकरात शक्तिप्रदर्शन केल्याचा आरोप तुपकर यांनी केला. मेहकरचा कार्यक्रम नेमका शासनाचा होता की शिवसेनेचा, याचे उत्तर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि जिल्हाधिकारी यांनी जनतेला दिले पाहिजे. कार्यक्रम पक्षाचा असेल तर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य प्रशासकीय अधिकारी व्यासपीठावर काय करत होते? आणि कार्यक्रम शासनाचा असेल तर राजकीय पक्षांचे पदाधिकारी पक्षाचे रुमाल घालून व्यासपीठावर काय करत होते, असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला.

▪️५०० रुपयांच्या आशेने महिला आल्या; ५० रुपयांच्या साड्या दिल्याचा आरोप!

मेहकरच्या मेळाव्यासाठी महिलांना ५०० रुपये रोज देण्याचे सांगून बोलावण्यात आले होते. मोठ्या आशेने महिला कार्यक्रमाला आल्या. मात्र, त्यांना पैसे देण्यात आले नाहीत. अवघ्या ५० रुपयांच्या साड्या देण्यात आल्या, तर काही महिलांना त्याही मिळाल्या नाहीत. त्यामुळे अनेक महिला नाराज होऊन परतल्याचा आरोप तुपकर यांनी केला. केवळ शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आणि स्वतःचे मंत्रिपद टिकवण्यासाठी प्रतापराव जाधव यांनी ही केविलवाणी धडपड केल्याची टीकाही त्यांनी केली.

▪️‘अधिकाऱ्यांनो, जरा पदाची गरिमा बाळगा!’

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाची गरिमा राखली पाहिजे. संविधान काय सांगते? लोकशाही काय सांगते? प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी काही नियम आहेत, राजशिष्टाचार आहे. तुम्ही अशा पद्धतीने राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात उघडपणे व्यासपीठावर बसत असाल, तर तुमच्यावर कारवाई का होऊ नये? असा थेट सवाल रविकांत तुपकर यांनी जिल्हा प्रशासनाला केला. या संपूर्ण प्रकरणाची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!