सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) खरिपात सोयाबीनची झडती घटली, कपाशीची फुलं गळाली, अनेक ठिकाणी बोंडंही फुटली नाहीत. खरिपात झालेलं नुकसान रब्बीत भरून काढण्याची आशा होती. मात्र पाण्याअभावी सिंदखेडराजा तालुक्यात रब्बीचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ८० टक्क्यांनी घटला. गेल्या वर्षी ३८ हजार ७१३ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. यंदा ती जेमतेम ७ हजार ८०० हेक्टरपर्यंत पोहोचली. म्हणजे जवळपास ३१ हजार हेक्टरवर रब्बीचा पेरा घटला.
जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला. ऑगस्टच्या मध्यापर्यंत रिमझिम सुरू होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. परतीचा पाऊसही आला नाही. नद्या-नाले कोरडे पडले. उभी पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरी, पाझर तलाव आणि सिंचन तलावांतून पाण्याचा उपसा केला. ज्यांच्याकडे पाण्याची सोय होती, त्यांना काही प्रमाणात पीक वाचवता आलं. कोरडवाहू शेतकऱ्यांना मात्र लागवड आणि मजुरीचा खर्चही वसूल करणे कठीण झाले.
रब्बीत सर्वाधिक फटका हरभऱ्याला बसला. गेल्या वर्षी १८ हजार ५३१ हेक्टरवर हरभरा होता. यंदा त्याचा पेरा ४ हजार ५० हेक्टरवर आला. गव्हाचा पेरा ११ हजार ८९६ हेक्टरवरून अवघ्या ८०० हेक्टरवर घसरला. ज्वारीची पेरणीही घटली. गेल्या वर्षी ८५० हेक्टरवर पेरलेल्या मक्याची यंदा रब्बीत पेरणीच झाली नाही.
गेल्या वर्षी पीक होतं, भाव नव्हता. यंदा भाव आहे, पण विकायला माल किती उरणार? मोजक्या क्षेत्रावर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता उरलेल्या पाण्यात पीक काढणीपर्यंत जगवण्याचं आव्हान आहे. त्यात हरभऱ्याला वन्यप्राण्यांचा, तर ज्वारीला पक्ष्यांचा उपद्रव. खरिपाचा खर्च पदरात पडलेला नाही. अशा परिस्थितीत रब्बीतून तो भरून निघेल का, हा प्रश्न सिंदखेडराजाच्या शेतकऱ्यांसमोर आहे.






Total Users : 3835131