बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सेवा म्हणजे काय? ती भाषणात नसते, ती कृतीत असते. आणि आज बुलढाण्यात ती कृतीतून दिसली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विदर्भ प्रांतात सुरू असलेल्या सेवा सप्ताहा अंतर्गत बुलढाणा नगर सेवा विभाग आणि मातृभूमी प्रभात शाखेच्या वतीने आज, दि. २० नोव्हेंबर रोजी एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला. एकीकडे थंडीत कुडकुडणाऱ्या गरजूंना उबदार ब्लँकेट, तर दुसरीकडे शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प, फळं आणि दिवाळी फराळ देण्यात आला
त्रिशरण चौकात उबदार माणुसकीचे दर्शन झाले.
येथे घिसडी काम करणाऱ्या भटक्या बांधवांची वस्ती आहे. दिवसभर लोखंड ठोकून, घाम गाळून उदरनिर्वाह करणारी ही माणसं. रात्री मात्र थंडीशी झुंज देत उघड्यावर झोपतात.त्यांच्या या वेदनेला जाणून स्वयंसेवकांनी आज त्यांना ब्लँकेटचे वाटप केले. ब्लँकेट मिळताच त्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान, हेच खरे दिवाळीचे गिफ्ट होते. एक ब्लँकेट म्हणजे फक्त कापड नाही, तर ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत’ हा विश्वास होता. तर दुसरीकडे शहरात कार्यरत असलेल्या नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
रोज पहाटे उठून, आपण झोपेत असताना शहराच्या रस्त्यावर झाडू मारणारे, नाल्या साफ करणारे, कचरा उचलणारे हे हात खरे तर शहराचे खरे शिल्पकार आहेत. पण त्यांना कधी कोणी गुलाब दिला आहे का?
आज स्वयंसेवकांनी त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. फळांचे वाटप करून, दिवाळी फराळ आणि चहापान देऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. एक गुलाब, एक फराळाचा घास आणि ‘धन्यवाद’चा एक शब्द, एवढ्यानेही त्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंद तरळला.
▪️सेवा हाच धर्म!
या प्रसंगी बुलढाणा नगर सेवा प्रमुख प्रभाकर पत्की आणि मातृभूमी प्रभात शाखेचे दीपक जोशी, शैलेश कमानी, बाबासाहेब वरणगावकर, प्रणव सावजी, मुकुंद जोशी, मदन पवार, काळकर व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.सेवा सप्ताहाचा खरा अर्थ हाच आहे. गरजूंच्या थंडीत उब बनणं आणि समाजासाठी राबणाऱ्या हातांना मान देणं.बुलढाण्यात आज तो अर्थ खऱ्या अर्थाने सार्थ ठरला.













Total Users : 3794840