देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) जिजाऊंच्या जन्मभूमीत पर्यटकांच्या मुक्कामाची सोय कधी होणार? ऐतिहासिक वैभवाला सुविधांची जोड कधी मिळणार? या प्रश्नांसह पर्यटन विकासाच्या प्रस्तावांची बातमी ‘हॅलो बुलढाणा’ने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वप्रथम प्रसारित केली होती. आता मंत्रालयातील बैठकीनंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी प्रत्यक्ष मातृतीर्थात पोहोचले असून, प्रस्तावित कामांच्या पाहणीमुळे पुढील कार्यवाहीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
सिंदखेडराजाच्या पर्यटन विकासासाठी आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या पाहणीमुळे महत्त्वाची चालना मिळाली आहे. मातृतीर्थाच्या गरजा मंत्रालयापर्यंत पोहोचवून त्यावर अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी घडवून आणण्यापर्यंत पाठपुरावा नेल्याने कायंदेंची भूमिका ठळकपणे समोर आली आहे.
१६ नोव्हेंबरला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार कायंदेंच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली होती. पर्यटक निवास, अभ्यागत सुविधा केंद्र, पायाभूत सुविधा आणि समृद्धी महामार्गावरील दिशादर्शक फलकांच्या प्रस्तावांवर चर्चा करून प्रत्यक्ष स्थळपाहणीचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार आज महामंडळाचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, उपअभियंता कल्याण भोसले, कनिष्ठ अभियंता विजय नागरे आणि योगेश राणे यांनी सिंदखेडराजाला भेट दिली. उपलब्ध जागा, विद्यमान सुविधा आणि प्रस्तावित कामांच्या संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात आली. कोणती कामे प्राधान्याने हाती घेता येतील, यावरही चर्चा झाली.
यावेळी आमदारांचे बंधू सतीश कायंदे, खडसे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी बोबडे आणि कनिष्ठ अभियंता अभंग जाधव उपस्थित होते.
जिजाऊंच्या जन्मभूमीचा गौरव सुविधांमधूनही दिसायला हवा, ही अपेक्षा आहे. त्या दिशेने प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा करणाऱ्या कायंदेंनी विकासाचा विषय प्रशासकीय कार्यवाहीत पुढे नेला आहे. ऐतिहासिक वारसा जपण्यासोबत पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आता पाहणी झाली; पुढची कसोटी अंमलबजावणीची!
कामांना मंजुरी, निधी आणि निश्चित वेळापत्रक कधी मिळते, याकडे लक्ष असेल. पर्यटक निवासासाठी नेमकी जागा कोणती, सुविधांची क्षमता किती आणि पहिल्या टप्प्यात कोणते काम होणार, हे स्पष्ट झाल्यास या प्रयत्नांना ठोस दिशा मिळेल. कायंदेंच्या पाठपुराव्यातून सुरू झालेली ही हालचाल प्रत्यक्ष सुविधांपर्यंत पोहोचावी, हीच मातृतीर्थाची अपेक्षा!













Total Users : 3794831