नायगाव (द.)मेहकर (हॅलो बुलढाणा) दुष्काळाने कंबरडे मोडले, लागवडीचा खर्चही निघाला नाही; त्यात कर्जमाफीसाठी बँकेच्या चकरा! या संतापातून शेकडो शेतकऱ्यांनी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तथा शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्टेट बँकेच्या नायगाव शाखेत ठिय्या मांडला. ‘‘यापुढे शेतकऱ्यांना त्रास दिल्यास गय करणार नाही,’’ असा इशारा पाटील यांनी दिला.
केवायसी करून दोन महिने उलटले, तरी कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झाली नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी मांडल्या. शाखा व्यवस्थापकाकडून उद्धट वागणूक मिळत असल्याचाही आरोप करण्यात आला. यावर पाटील यांनी व्यवस्थापकाला धारेवर धरत रखडलेल्या प्रकरणांचा जाब विचारला.
सक्तीची विमावसुली आणि नवीन पीककर्जातील विलंबावरही त्यांनी आक्षेप घेतला. प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची सक्ती टाळून साध्या कागदावर दहा रुपयांचे तिकीट लावलेले प्रतिज्ञापत्र स्वीकारण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
इतर बँकांचा बोजा असलेल्या शेतकऱ्यांच्या पीककर्जाचा प्रश्नही उपस्थित झाला. यासंदर्भात संबंधित मास्टर सर्क्युलरच्या क्रमांकासह बँकेकडून लेखी पत्र घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महसूलमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकऱ्यांना वारंवार फेऱ्या मारायला लावण्याऐवजी त्यांच्या अडचणी सोडवा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून पाटील यांनी राज्य सरकारवरही शेतकऱ्यांना वेठीस धरल्याचा आरोप केला.
‘‘शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ आणि नवीन पीककर्ज मिळेपर्यंत लढा थांबणार नाही,’’ असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आंदोलनात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.













Total Users : 3794831