जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) मुलाला पाहण्यासाठी पाहुणे येणार म्हणून घरात तयारी सुरू होती; पण आनंदाच्या तयारीवर क्षणात संकट कोसळले! तिवडी येथे १९ नोव्हेंबर रोजी गॅसचा भडका उडाल्यानंतर दोन सिलेंडरचा स्फोट झाला. शेतकरी विनोद दयाराम झाल्टे यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत कष्टाने उभा केलेला संसार उद्ध्वस्त झाला. सुदैवाने जीवितहानी टळली.
महिलांनी स्वयंपाकाला सुरुवात करताच गॅसची नळी निघाली आणि भडका उडाला. काही क्षणांत घराला आगीने वेढले. त्यानंतर दोन सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. घरातील २५ क्विंटल सोयाबीन, गहू, इतर धान्य आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. भावी सुनेसाठी तयार केलेली सोन्याची पोतही आगीत सापडली. डोळ्यांदेखत संसार जळताना झाल्टे दाम्पत्याला अश्रू अनावर झाले.
माहिती मिळताच अर्ध्या तासात जळगाव जामोद नगरपालिकेचे अग्निशामक दल पोहोचले. सय्यद नईम वाकोद्दीन, संकेत गायकी, ऋषिकेश जयंत इथापे आणि शुभम रोजतकार यांनी चार तास झुंज देत आग आटोक्यात आणली.
या दुर्घटनेने झाल्टे कुटुंबापुढे उदरनिर्वाहासह पुन्हा संसार उभारण्याचे मोठे आव्हान उभे केले आहे. मुलाच्या लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या कुटुंबावर आता मदतीची अपेक्षा करण्याची वेळ आली आहे













Total Users : 3794831