देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) एसटीच्या मालमत्तेचे योग्य मूल्यांकन झाले की कवडीमोल दरात विल्हेवाट लावण्यात आली? चिखली आगारातील ई-बस विद्युत चार्जिंग स्टेशन परिसरातील ५२ झाडांच्या लाकूड लिलावावरून हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. लाकडाची जीएसटीसह प्रतिकिलो केवळ १ रुपया १८ पैसे दराने विक्री झाल्याचे संबंधित पत्रात नमूद असल्याचा दावा चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी केला आहे. या व्यवहारात संभाव्य आर्थिक अनियमितता झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
खरात यांनी १८ नोव्हेंबर रोजी परिवहनमंत्री, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात कोटेशन क्रमांक ०३/२०२६-२७, दिनांक २ नोव्हेंबर आणि कार्यादेश क्रमांक ७०७९, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ यांचा संदर्भ दिला आहे.
हा दर ठरवला कुणी? लाकडाचे स्वतंत्र मूल्यांकन झाले होते का? किती कोटेशन आली? स्पर्धात्मक प्रक्रियेतून महामंडळाला योग्य महसूल मिळवून देण्याची खातरजमा झाली का? या प्रश्नांची उत्तरे चौकशीतून समोर आणण्याची मागणी खरात यांनी केली आहे.
झाडांच्या प्रजाती, लाकडाची गुणवत्ता, प्रत्यक्ष वजन, प्रचलित बाजारभाव आणि विक्रीतून मिळालेली रक्कम तपासावी, असे निवेदनात म्हटले आहे. वजनाच्या नोंदी, जीएसटी, बँकेत जमा रक्कम, वाहतूक कागदपत्रे आणि लाकूड हस्तांतरणाच्या नोंदींचाही ताळमेळ तपासण्याची मागणी आहे.
प्रस्ताव तयार करणारे, दर निश्चित करणारे, मंजुरी देणारे आणि प्रत्यक्ष विक्रीची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी-कर्मचारी यांच्या भूमिकेची स्वतंत्र तपासणी करावी. कोणाला अनुचित लाभ मिळाला का, याचाही शोध घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
चौकशी केवळ स्थानिक पातळीवर न करता मुख्यालयातील दक्षता, वित्त-लेखा विभाग आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या स्वतंत्र समितीमार्फत करावी. नुकसान सिद्ध झाल्यास जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय, आर्थिक आणि आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी खरात यांनी केली आहे













Total Users : 3794841