देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) मुक्या जनावरांना चारा न देता उपाशी ठेवायचे, वाहनांमध्ये निर्दयपणे कोंबायचे आणि वाहतुकीचा परवानाही बाळगायचा नाही! देऊळगावमही ते खैरव मार्गावर उघडकीस आलेल्या प्रकाराने प्राण्यांच्या वाहतुकीतील क्रूरता समोर आली आहे. सहा वाहनांमधून तब्बल ४४ गोवंशांची अशा अवस्थेत वाहतूक केल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१९ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास ही कारवाई झाली. पोलीस नोंदीनुसार, संबंधित वाहनांमध्ये जनावरांना निर्दयतेने कोंबण्यात आले होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा चारा दिलेला नव्हता. शिवाय, जनावरांच्या वाहतुकीचा परवानाही संबंधितांकडे नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणातील ४४ गोवंशांची किंमत आठ लाख ८० हजार रुपये, तर सहा वाहनांची किंमत ४० लाख रुपये आहे. एकूण मुद्देमालाचे मूल्य ४८ लाख ८० हजार रुपये असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
शेख शब्बीर शेख शौकत (२८), अब्दुल रहेमान शेख नजीर (२५), शेख नूर महमंद शेख करीम (५१), भास्कर मुरलीधर उगलमुगले (४३, सर्व रा. देऊळगावमही), निखील रमेश पांडे (३५, रा. संजयनगर, देऊळगाव राजा) आणि शेख शाहरुख शेख फारुख (२७, रा. करीमनगर, देऊळगाव राजा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस कर्मचारी प्रवीण मदन डोईफोडे यांच्या लेखी फिर्यादीवरून प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमातील संबंधित तरतुदींसह महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा क्रमांक ५२३/२०२६ नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर करीत आहेत.













Total Users : 3794840