spot_img
spot_img

एसटीत चिमुरड्याचा हुंदका… ज्योत्स्ना गवईंनी दिला धीर, अंढेरा पोलिसांनी शोधले तीन वर्षांच्या खादिमचे आई-वडील!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) अंढेरा फाट्यावर एसटी बसमध्ये तीन वर्षांचा चिमुरडा एकटाच रडत होता. त्याच्यासोबत कुणी आहे का, याची चौकशी झाली, तेव्हा बसमध्ये त्याचा एकही नातेवाईक नसल्याचं समोर आलं. त्याच बसमधून प्रवास करणाऱ्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योत्स्ना गवई यांनी प्रसंगावधान दाखवलं आणि चिमुरड्याच्या पालकांचा शोध सुरू झाला.

१४ नोव्हेंबर २०२६ रोजी देऊळगाव राजा ते अंढेरा फाटा मार्गावर ही घटना घडली. गवई यांनी बस वाहकाकडे चौकशी केली असता, मुलगा देऊळगाव मही येथून बसमध्ये चढल्याचं समजलं. हा धागा मिळताच गवई यांनी मुलाला सुरक्षितपणे अंढेरा पोलीस ठाण्यात आणलं.

ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून शोध घेतला. मुलगा देऊळगाव मही येथील तीन वर्षांचा खादिम हुसेन शेख सादिक असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी त्याची आई फरिनबी सादिक शेख आणि वडील सादिक शेख यांच्याशी संपर्क साधला.

आई-वडील पोलीस ठाण्यात पोहोचले. ताबा पावतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पोलिसांनी खादिमला त्यांच्या स्वाधीन केलं. मुलाला सुखरूप पाहताच दोघांनाही मोठा दिलासा मिळाला. बसमधल्या चिमुरड्याच्या रडण्याकडे लक्ष देऊन तातडीने पावलं उचलणाऱ्या ज्योत्स्ना गवई यांच्या तत्परतेचं कौतुक होत आहे.

दरम्यान, बसमध्ये चढताना, उतरताना आणि गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांकडे सतत लक्ष ठेवा. सार्वजनिक वाहतुकीत मुलांना एकटं सोडू नका, असं आवाहन ठाणेदार रुपेश शक्करगे आणि अंढेरा पोलीस कर्मचाऱ्यांनी केलं.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!