spot_img
spot_img

BIG NEWS! “पोलीस आपलेच भाऊ आहेत…” पण त्यांना यात्रेत पाठवणाऱ्यांना जाब विचारणार! देवधाब्यात तुपकरांचा सरकारवर थेट निशाणा कोण येतंय, कुणाशी बोलतोय, कुठे मुक्काम करतोय… सगळ्यावर पाळत असल्याचा रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप. “अभी तो शुरुआत है!” ४ डिसेंबरला बुलढाण्यात ‘एल्गार’चा इशारा!

मलकापूर (हॅलो बुलढाणा) मलकापुरातून दुष्काळ संघर्ष यात्रा निघाली आणि पहिल्याच दिवशी देवधाब्याच्या सभेत रविकांत तुपकरांनी सरकारवर गंभीर आरोप केला. यात्रा चिरडण्यासाठी सरकारने साध्या वेशातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेचे कर्मचारी यात्रेत पाठवले असून, आपल्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याचा दावा त्यांनी केला. “तुम्हाला जे करायचं ते करा, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा हा संघर्ष थांबणार नाही,” असे आव्हान तुपकरांनी दिले.

पोलीस पाठवणाऱ्यांना जाब विचारणार

यात्रेत कोण येतं, कोण जातं, आम्ही कुठे मुक्काम करतो आणि कुणाशी बोलतो, यावर लक्ष ठेवलं जात असल्याचा आरोप तुपकरांनी केला. “आमचं पोलिसांशी भांडण नाही. पोलीस आपलेच भाऊ आहेत,” असे सांगत त्यांनी आपला रोख पोलीस पाठवणाऱ्यांकडे असल्याचे स्पष्ट केले. “कुत्रा दगडाला डसत नाही, दगड ज्या दिशेने आला त्या दिशेने जातो,” असा दाखला देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

१४ नोव्हेंबरला मलकापुरातून निघालेल्या यात्रेला पहिल्याच दिवशी गावागावांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देवधाब्यात रात्री झालेल्या सभेलाही शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोयाबीन-कापसाला भाव, मेंढपाळांना विशेष पॅकेज

सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि कर्जमाफी, या मागण्या तुपकरांनी सभेत मांडल्या. मेंढपाळांच्या आंतरजिल्हा चराईवरील निर्बंध हटवावेत, २०१९ च्या अतिवृष्टीत दगावलेल्या शेळ्या-मेंढ्यांची भरपाई द्यावी आणि सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मेंढपाळ व पशुपालकांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. दुष्काळ आणि शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले.

‘अभी तो शुरुआत है!’ ४ डिसेंबरला बुलढाण्यात एल्गार

जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतून मार्गक्रमण केल्यानंतर ४ डिसेंबरला बुलढाण्यात यात्रेचा समारोप होईल. त्याच दिवशी ‘एल्गार महामोर्चा’ होणार असून, सकाळी ११ वाजेपर्यंत जिजामाता प्रेक्षागृह परिसरात जमण्याचे आवाहन तुपकरांनी गावागावांतील शेतकऱ्यांना केले. “४ डिसेंबरला बुलढाण्यात बळीराजाची ताकद काय असते, हे सरकारला दाखवून देऊ,” असा इशारा त्यांनी देवधाब्याच्या सभेतून दिला. आता शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!