देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) गावांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या पंचायत समितीच्या स्वतःच्या कार्यालयात स्वच्छतेची काय अवस्था आहे? हा प्रश्न विचारण्यासाठी देऊळगाव राजातील अशोक रामेश्वर जायभाये थेट पंचायत समितीत पोहोचले. सोबत होते ‘हार्पिक’ आणि संडास साफ करायचा ब्रश! गटविकास अधिकारी मुकेश माहोर आणि विस्तार अधिकारी त्या वेळी उपस्थित नसल्याने, त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांसमोरील टेबलांवर स्वच्छतेचे साहित्य ठेवून जायभाये यांनी निषेध नोंदवला.
जायभाये यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी बुलढाणा येथील अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली होती. पंचायत समितीतील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत इमारतीतच गुटखा, पान आणि तंबाखूचे सेवन करून जागोजागी थुंकतात, असा आरोप त्यांनी अर्जात केला आहे. कार्यालयातील अस्वच्छता दाखवणारे जिओ-टॅग असलेले फोटोही तक्रारीसोबत जोडल्याचे त्यांनी नमूद केले. लेखी तक्रार दिल्यानंतरही कार्यालयाच्या स्वच्छतेत सुधारणा दिसली नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यातूनच अधिकाऱ्यांना स्वच्छतेचे साहित्य भेट देण्याचा मार्ग त्यांनी निवडला.
जायभाये यांनी अर्जात ‘कोटपा’ कायद्याचाही उल्लेख केला आहे. या कायद्याच्या कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी असून, नागरिकांना प्रवेश असलेल्या शासकीय कार्यालयांचाही त्यात समावेश होतो.
ग्रामपंचायतींना आदर्श गाव घडवण्याचे मार्गदर्शन करणाऱ्या तालुक्याच्या मुख्य कार्यालयातच स्वच्छतेची तक्रार करावी लागत असेल, तर गावांना कोणता आदर्श दिला जाणार, असा सवाल जायभाये यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधी या प्रकाराची दखल घेणार का, असाही प्रश्न त्यांनी केला आहे. तक्रारीवर अन्न व औषध प्रशासनाने काय कार्यवाही केली आणि कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी गटविकास अधिकारी काय पावले उचलणार, याचे उत्तर अद्याप स्पष्ट झालेले नाही













Total Users : 3744184