spot_img
spot_img

बुलढाणा कारागृह अधीक्षकांच्या घरातच मृत्यूने ठोकले दार! लहान मुले खेळत असताना कोपऱ्यात फणा काढून बसला होता अतिविषारी नाग!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा कारागृह अधीक्षक सौ. मेघा बाहेकर यांच्या शासकीय निवासस्थानी काल जे घडलं, ते ऐकूनच अंगावर काटा येईल. घरात लहान बालगोपाल निरागसपणे खेळत होते आणि त्याच घराच्या एका कोपऱ्यात मृत्यू फणा काढून बसला होता तो म्हणजे अतिविषारी नाग…कोब्रा!

एका क्षणाचा जरी उशीर झाला असता, एका चिमुकल्याने जरी त्या सापाला हात लावला असता, तर बुलढाण्यात आज वेगळीच बातमी छापली गेली असती. पण नियतीला ते मान्य नव्हतं.

कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर यांनी घाबरून न जाता क्षणाचाही विलंब न करता थेट बुलढाण्याचे सुप्रसिद्ध सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना फोन लावला. “रसाळ साहेब, लवकर या, घरात नाग आहे, मुले आहेत!” ही एकच हाक ऐकली,आणि
माहिती मिळताच श्रीराम रसाळ यांनी वेळ न घालवता निवासस्थान गाठलं. हातात सुरक्षित उपकरणे, चेहऱ्यावर जराही भीती नाही. लपून बसलेल्या त्या विषारी नागाला त्यांनी अत्यंत कौशल्याने, मोठ्या मेहनतीने बाहेर काढलं. तो सामान्य साप नव्हता, तर अत्यंत विषारी जातीचा कोब्रा होता, हे तपासणीत स्पष्ट झालं. रसाळ यांनी त्या नागाला सुखरूप जेरबंद केलं आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडून दिलं.

▪️बाहेकरांकडून रसाळ यांचा गौरव !

मोठा अनर्थ टळल्याने कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर यांनी रसाळ यांचे आभार मानून अभिनंदन केलं. “मानवी वस्तीत आढळणारे साप रसाळ हे जिवाची पर्वा न करता सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडतात, त्यांचं हे निस्वार्थ कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे,” अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!