साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा) बारा वर्षांचा संसार आणि दोन मुलांचे भविष्य समोर असतानाही इन्स्टाग्रामवर प्रेमसंबंध जुळलेल्या युवकासोबत राहण्याचा निर्णय एका विवाहित महिलेने घेतला. पती, नातेवाईक आणि पोलिसांनी समजूत काढूनही तिने आपली भूमिका बदलली नाही. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात कौटुंबिक तणावाचे नाट्य रंगले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला दहा वर्षांचा आणि सुमारे चार ते पाच वर्षांचा अशी दोन मुले आहेत. लांबच्या नात्यातील तीस वर्षीय युवकासोबत इन्स्टाग्रामवरून तिची जवळीक वाढली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर महिला लहान मुलाला सोबत घेऊन त्या युवकासोबत निघून गेली.
पतीच्या तक्रारीनंतर दोघे एका गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांना साखरखेर्डा पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पती, काका, चुलत भाऊ आणि इतर नातेवाइकांनी महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही बराच वेळ संवाद साधला.
मात्र, ‘मला पतीसोबत राहायचे नाही; याच्यासोबतच राहणार,’ अशी भूमिका महिलेने घेतली. युवकानेही तिच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. नातेवाइकांचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी मेहकर पोलिसांकडे सोपविण्यात आले.
संबंधित प्रकरण मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने महिलेला मेहकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मेहकरला जातानाही युवकाच्याच वाहनातून जाण्याचा आग्रह तिने धरला. अखेर दोघे मेहकरकडे रवाना झाले.





Total Users : 3715324