देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) भरदिवसा सराफा व्यापाऱ्याला जबरदस्तीने इनोव्हामध्ये बसवून नेले… अपहरणाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली… अन् जिल्हाभर पोलीस यंत्रणा कामाला लागली! मात्र, साखरखेर्डा येथे संबंधित वाहन अडविल्यानंतर त्यातील व्यक्ती तेलंगणा एलसीबीचे पोलीस असल्याचे समोर आले आणि या नाट्यमय प्रकरणाचा उलगडा झाला.
देऊळगाव मही येथील योगीराज ज्वेलर्सचे मालक अनिरुद्ध मधुकर शिंगणे (वय ३२) सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी जमिनीच्या व्यवहारानिमित्त देऊळगाव राजा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. दुपारी सव्वाएकच्या सुमारास सिल्व्हर रंगाच्या इनोव्हातून आलेल्या व्यक्तींनी एलसीबी अधिकारी असल्याचे सांगत त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवून नेल्याची माहिती आहे.
हा प्रकार शिंगणे यांचे मामा, शिक्षक चेके यांनी पाहिला. घटनेनंतर नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठांना माहिती मिळताच नियंत्रण कक्षातून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले. बुलढाण्यासह जालना जिल्ह्यातही वाहनाचा शोध सुरू झाला.
अखेर दुपारी चारच्या सुमारास साखरखेर्डा हद्दीत इनोव्हा अडविण्यात आली; अन् अपहरणाच्या संशयाला वेगळे वळण मिळाले! सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीतील कथित गैरव्यवहाराच्या तपासासाठी तेलंगणा एलसीबीने शिंगणे यांना ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली.
स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना नसल्याने ही धावपळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी देऊळगाव राजा ठाण्यात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
वृत्त लिहीपर्यंत साखरखेर्डा ठाण्यात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. नेमका व्यवहार कोणता आणि शिंगणे यांची भूमिका काय? याबाबत स्थानिक पोलिसांचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नव्हता.
त्यामुळे कथित गैरव्यवहाराचे स्वरूप, तेलंगणातील तपासाचा संदर्भ आणि पुढील कारवाईचे तपशील अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असली, तरी शिंगणे यांच्यावरील आरोपांचे नेमके स्वरूप अधिकृत माहितीनंतरच स्पष्ट होणार आहे. आता संबंधित तपासाबाबत पोलिसांच्या सविस्तर खुलाशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Total Users : 3708515