बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एकीकडे दुष्काळाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले, तर दुसरीकडे पाणी आणि चारा टंचाईने गोशाळांमधील गोमातेच्या घासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकारने मान्यता दिलेल्या १०१४ गोशाळांमधील पशुधनासाठी दररोज प्रतिदिन केवळ १०० रुपये अनुदान दिले जात आहे. या तुटपुंज्या रकमेत दुष्काळात पशुधन कसे जगणार, असा आर्त सवाल गोशाळा महासंघाने उपस्थित केला आहे.
गोशाळा महासंघ जिल्हा बुलढाणा यांच्यावतीने मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.
महासंघाने म्हटले आहे की, महाराष्ट्र हे पशुधनाच्या संख्येत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरीच गोशाळांकडे आपले पशुधन सोडून जातात, त्यामुळे गोशाळांवरील ताण आणखी वाढतो. १०० रुपयांच्या अनुदानात रोजचा चारा, पाणी, औषधोपचार अशक्य आहे. भविष्यात तर पाणीही विकत घ्यावे लागणार असल्याची भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. सरकार दरबारी गोशाळा मान्यताप्राप्त आहेत, पण प्रत्यक्षात त्या गोशाळा कशा चालवायच्या, याचा विचार होत नाही. चारा टंचाईने शेतकरी आधीच हतबल आहे, तर गोशाळा चालकही देणग्यांवर आणि कर्जावर गायी जगवत आहेत. अशा स्थितीत सरकारने तातडीने विचार करून अनुदानात भरीव वाढ करावी, अशी मागणी आहे.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री, सचिव यांनाही देण्यात आल्या आहेत.





Total Users : 3705440