spot_img
spot_img

जंगलात कुऱ्हाड… रखवालदारांवरच आरोपांची धार! अंचरवाडीतील वृक्षतोड अन् मुरुम उपशाप्रकरणी तक्रारी; धमकावून ३५०० रुपये घेतल्याचाही आरोप!

चिखली (हॅलो बुलढाणा) जंगलाचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवरच आरोप झाल्याने अंचरवाडी बीटमधील कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अवैध वृक्षतोड, मुरुम उपसा आणि धमकावून पैसे स्वीकारल्याच्या आरोपांबाबत मोतीसिंग परिहार व विशाल खिल्लारे यांनी ३० ऑक्टोबर रोजी बुलढाणा उपवनसंरक्षकांकडे स्वतंत्र तक्रारी करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

मोतीसिंग परिहार यांच्या तक्रारीनुसार, अंचरवाडी वनक्षेत्रात विनापरवानगी झाडे तोडण्यात आली असून, लाकडाची वाहतूक, साठवणूक अथवा विक्री झाल्याचा संशय आहे. यामध्ये वनरक्षक व वनमजुरांचे आदेश, संमती किंवा सहभाग होता का, हे तपासावे, अशी त्यांची मागणी आहे. प्रत्यक्ष पाहणी, पंचनामा आणि संबंधितांच्या भूमिकेची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. व्हिडिओ व छायाचित्रे सादर करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

दुसरीकडे, विशाल खिल्लारे यांनी वनरक्षक गजानन पोटे व वनमजूर ऋषीकेश तुपकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १० डिसेंबर २०२५ रोजी जनावरे अडवून अटक व जप्तीची धमकी दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तुपकर यांच्या फोनपे खात्यावर ३५०० रुपये पाठवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर रोख रक्कम दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. व्यवहाराचे स्क्रीनशॉट व हिस्ट्री सादर करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

आता तक्रारींच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर येणार का?

आरोपांचे गांभीर्य पाहता वनविभागाने पुरावे तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची गरज आहे. हे तक्रारींतील आरोप असून, त्यांची सत्यता चौकशीतून स्पष्ट होणे बाकी आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची बाजूही महत्त्वाची ठरणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!