बुलढाणा/नांदेड (हॅलो बुलढाणा) नांदेडमध्ये एका खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयामध्ये एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळला आहे. कंपनीने हा आत्महत्येचा बनाव केला असून ही आत्महत्या नसून वसुलीपोटी केलेला खून आहे, असा थेट आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे.
संघटनेने मागणी केली आहे की या फायनान्स कंपनीच्या मालक, सर्व डायरेक्टर आणि स्थानिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कलम 302 (खून) चा गुन्हा दाखल करावा.
व्हिडिओत संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की, राज्यभर मायक्रो फायनान्स, खाजगी फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांनी उच्छाद मांडला आहे. वसुलीच्या नावाखाली दहशत निर्माण करणे, रस्त्यात वाहन, ट्रॅक्टर जप्त करणे, गुंडागर्दी करणे हे प्रकार सुरू आहेत. या कंपन्या RBI च्या नियमांचे उल्लंघन करून 30-40% व्याज आकारतात.
“या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वसुलीला आमच्या दारात पाठवू नका, व्याज माफ करा. नांदेडच्या घटनेत जर 302 दाखल झाला नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्रात एकही मायक्रो फायनान्स, खाजगी फायनान्स कंपनीचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही, आमची भूमिका अत्यंत आक्रमक असेल,” असा इशाराही मुख्यमंत्र्यांना उद्देशून देण्यात आला आहे.





Total Users : 3656663