मेहकर (हॅलो बुलढाणा) दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना पिण्याच्या पाण्याचा साठा टिकवण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. हिवरा साबळे आणि रत्नापूर येथील पाझर तलावांवरून पाणी उपसण्यासाठी लावलेले ११ मोटारपंप व केबल संयुक्त पथकाने २३ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले.
वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि महावितरणच्या संयुक्त समितीने ही कारवाई केली. ग्रामविकास अधिकारी शरद वानखेडे, तलाठी गणेश बाजार आणि महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री. कराळे यांनी प्रत्यक्ष कार्यवाही केली. जप्त केलेले मोटारपंप आणि केबल ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.
पाझर तलावांतील उपलब्ध पाणीसाठा ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, अनियंत्रित उपसा सुरू राहिल्यास आगामी काळात टंचाईचे संकट आणखी गडद होऊ शकते. त्यामुळे जलसाठ्याचे संरक्षण आणि उपशावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.
मोटारी जप्त झाल्या; आता पाण्याच्या नियोजनाचे काय?
केवळ मोटारपंप ताब्यात घेऊन पाणीटंचाईचा प्रश्न संपणार नाही. तलावांतील उपलब्ध साठ्याचा आढावा, नियमित देखरेख आणि पिण्याच्या पाण्याच्या वितरणाचे ठोस नियोजनही आवश्यक आहे. कारवाईनंतर पुन्हा उपसा सुरू होऊ नये, यासाठी सातत्यपूर्ण लक्ष ठेवणे तितकेच गरजेचे आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक थेंब जपण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत पुढील उपाययोजना किती वेगाने राबवल्या जातात, याकडे आता लक्ष लागले आहे. उपलब्ध साठा टिकवण्यासाठी प्रशासनाच्या पुढील कृतीची कसोटी लागणार आहे.






Total Users : 3653977