जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) एकीकडे दसऱ्याचा उत्साह, तर दुसरीकडे दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाचा आक्रोश! सरकारची पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा घणाघात करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने मंगळवारी जळगाव जामोद येथे आक्रमक आंदोलन छेडले.
जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी ठेचा-भाकर खाऊन सरकारचा निषेध केला. संतप्त कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा प्रतीकात्मक पुतळाही जाळला.
एकरी ३० ते ४० हजारांचा खर्च अन् मदत अवघी पाच हजार? शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
जुलैतील अतिवृष्टीने जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील शेती उद्ध्वस्त झाली. तरीही बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत, प्रलंबित अनुदान आणि पीकविम्याची भरपाई तातडीने देण्याची मागणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटिल, विश्वासराव भालेराव, तालुकाअध्यक्ष,प्रमोद सपकाळ, महादेव भालतडक,वर्षा वाघ,ईरफान खान, सिद्धार्थ हेलोडे, विठ्ठल वाघ, राजेंद्र देशमुख,करीम खान,शत्रुघ्न कोकाटे, वामन गुडेकर, आशिष वायझोडे, दत्ता डिवरे, अमोल व्यवहारे,देविदास पारस्कर, शालिग्राम रोठे,प्रदिप बोबडे, श्रीकृष्ण जाधव,एजाज देशमुख, मनोहर वाघ, योगेश भिसे,कैलास मानकर, अनंता वाघ,नितीन उगले,अंबादास सारोकार,डिगाबर तिजारे, सतिष तायडे, मनोहर ठाकरे,विष्णु आटोळे, विष्णु रोठे,धनंजय सारोकार, जय कागदे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देत प्रसेनजीत पाटलांनी सरकारविरोधात रणशिंग फुंकले!







Total Users : 3640970