मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) हातात चहाचा कप, मनात सेवेची भावना अन् ओठांवर बुद्धांचा संदेश! नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या धम्म बांधवांसाठी मलकापूर रेल्वे स्टेशनवर माणुसकीचा सुंदर सोहळा पाहायला मिळाला. धरणगाव येथील करुणा स्मारक समितीने धम्म बांधवांना चहाचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
दीक्षाभूमीच्या दर्शनासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या उपासक आणि उपासिकांना प्रवासातील थकवा दूर व्हावा, त्यांना काहीसा दिलासा मिळावा, या उदात्त हेतूने समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. कोणताही बडेजाव नाही, दिखाऊपणा नाही; केवळ धम्म बांधवांची निःस्वार्थ सेवा करण्याचा ध्यास!
भगवान गौतम बुद्धांनी जगाला दिलेल्या करुणा, समता, मैत्री आणि बंधुत्वाच्या महान विचारांचे दर्शन या उपक्रमातून घडले. ‘धम्मसेवा हीच मानवसेवा’ हा संदेश समितीने केवळ शब्दांतून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून दिला.
एकीकडे दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या धम्म बांधवांची श्रद्धा, तर दुसरीकडे त्यांच्या सेवेसाठी सज्ज असलेले कार्यकर्ते! मलकापूर रेल्वे स्टेशनवरील या सेवाभावी उपक्रमाने सामाजिक एकोप्याचा संदेश दिला.






Total Users : 3639561