spot_img
spot_img

गुजरातमध्ये दडला, चिखली पोलिसांनी गाठला! फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला बेड्या!तांत्रिक विश्लेषण अन् गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकाची कारवाई; तिसऱ्या आरोपीच्या अटकेने तपासाला गती!

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) फसवणूक आणि विश्वासघाताच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला चिखली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुजरातमध्ये जाऊन अटक केली. बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष ‘फरार व पाहिजे आरोपी शोध मोहिमे’अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मुस्ताकभाई उस्मानभाई कडीवार (वय ४०, रा. लिंबाडा, ता. वाकानेर, जि. मोरबी, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

चिखली पोलीस ठाण्यात २३ जानेवारी २०२५ रोजी दाखल झालेल्या अपराध क्रमांक ७९/२०२५ मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४२० आणि ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या आरोपीला पंढरकवडा येथून पकडण्यात आले. मात्र, तिसरा आरोपी मुस्ताकभाई कडीवार पोलिसांना हवा होता. त्याला अटक करण्यासाठी चिखली डीबी पथक सातत्याने माहिती गोळा करत होते.

पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या सूचनेनुसार पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे शोध सुरू ठेवला. आरोपीचा माग काढत पथक गुजरातमधील वाकानेर परिसरात पोहोचले आणि कडीवारला अटक केली. जिल्ह्याबाहेर गेलेल्या पाहिजे आरोपीचा शोध घेऊन त्याला पकडण्यात पथकाला यश आले.

एका आरोपीच्या अटकेवर न थांबता या गुन्ह्यातील इतर पाहिजे आरोपींचाही शोध घेण्यावर चिखली पोलिसांनी भर दिला. मुख्य आरोपी आणि पंढरकवडा येथून अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीपाठोपाठ आता तिसऱ्या आरोपीलाही पकडण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आणखी एका पाहिजे आरोपीचा शोध पूर्ण झाला आहे. सातत्याने माहिती संकलन आणि तिच्या आधारे केलेल्या कारवाईचे हे फलित असल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकातून स्पष्ट होते.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली. पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल गवई, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत धंदर, अजय इटावा, राहुल पायघन आणि ज्ञानेश्वर शिंदे यांनी कारवाई केली. गुजरातपर्यंत माग काढून चिखली डीबी पथकाने फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!