बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘शिवाजी कोण होता?’ या ३७ वर्ष जुन्या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता पोलीस महासंचालकांच्या दारात पोहोचला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज करून पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांची चौकशी आणि मालमत्ता जप्तीची मागणी केली आहे.दरम्यान एका पत्रकार परिषदेत ‘शिवरायांचा महाराष्ट्र शिवराळ होतोय‘ असा अॅड.असीम सरोदेंनी मीडिया समोर घणाघात करून आमदार गायकवाड यांचे अर्जातील प्रश्न मूर्खासारखे असल्याचे म्हटले आहे.
‘शिवाजी कोण होता?’या पुस्तकाच्या वादावरून आमदार गायकवाड यांनी पोलीस महासंचालकांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ‘कोणत्या जिहादी, दहशतवादी संघटनेने पैसा पुरवला?’ याची चौकशी करावी.तसेच प्रकाशकाचे आरएनआय सर्टिफिकेट, प्रेस परवाना, आयटीआर आणि सर्व मालमत्ता राष्ट्रीय संपत्ती म्हणून जप्त करावी,अशी मागणी केली आहे.दरम्यान DGP च्या आदेशावरून कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांनी प्रशांत आंबी यांना दोन दिवस पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. “तुला कोणता जिहादी मदत करतो? तुझी मालमत्ता किती? बँकेत किती पैसे आहेत?” असे प्रश्न विचारण्यात आले. यावर आंबी म्हणाले, “ही चौकशीच बेकायदेशीर आहे. माझी आई यल्लवा जोगवा मागते, बहीण धुणी-भांडी करते.माझ्याकडे ९९ वर्षाच्या भाडेकरारावर एकच घर आणि एक दुचाकी आहे. पोस्टाने मला ३ लाख २० हजारांची वसुली नोटीस पाठवली आहे. माझे ३ हप्ते थकले आहेत. मग माझ्याकडे कोट्यवधीची मालमत्ता कुठून आली?”
▪️सरोदेंचा घणाघात – ‘ आ.गायकवाडांचे प्रश्न मूर्खासारखे!’
“संजय गायकवाड सारखे अशिक्षित, अडाणी प्रवृत्तीचे लोक पूर्ण पुस्तक वाचत सुद्धा नाहीत आणि इतरांना शिवीगाळ सुरु करतात. त्यांचे प्रश्न हे निव्वळ मूर्खासारखे आहेत. छत्रपतींना आपल्या आईप्रमाणे हृदयात स्थान देऊन ‘शिवाजी’ म्हणणे हा अपमान नाही. आता अशा मूर्खतेला कायद्याने लगाम लावावा लागेल.
“आमदारांनी ९ मिनिटांत ३६ शिव्या, आई-बहिणीवरून अत्यंत अश्लील शिवीगाळ आणि कुटुंबाला बलात्काराची धमकी देऊन १६३ दिवस उलटले, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. आणि ज्याला धमकी दिली, त्याचीच उलट चौकशी होते, हा कोणता न्याय आहे? शिवरायांचा महाराष्ट्र शिवराळ होतोय.” असे सरोदे म्हणाले.पुढे जाहीर केले की, लवकरच बुलढाणा येथे, आमदार गायकवाडांच्या मतदारसंघातच ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात येणार आहे.






Total Users : 3605010