spot_img
spot_img

अन्नदाता संकटात… जल्लोषाला फाटा, मदतीचा वाटा! बुलढाण्यात नाभिक समाजाचा आदर्श निर्णय; जिवाजी महाले जयंतीची शोभायात्रा टाळली, ५१ हजारांचा निधी शेतकरी मदतीसाठी देणार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या घरात संकट असताना आपण उत्सवाचा जल्लोष कसा करायचा? याच संवेदनशील भूमिकेतून बुलढाण्यातील नाभिक समाजाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. वीररत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी काढण्यात येणारी शोभायात्रा टाळून, त्यावरील खर्च शेतकरी मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय समाजबांधवांनी घेतला आहे. जवळपास ५१ हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीररत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी शहरात सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यानंतर समाजाच्या नियोजित सभागृहाच्या जागेत अभिवादन कार्यक्रम पार पडला. मात्र, सायंकाळच्या शोभायात्रेबाबत समाजाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

दुष्काळाने अडचणीत आलेला शेतकरी, संकटात सापडलेली पिके आणि आर्थिक विवंचनेत असलेली कुटुंबे यांच्याप्रती आत्मीयता व्यक्त करत वीररत्न जिवाजी महाले सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि समाजबांधवांनी मदतीचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वानुमते पाठिंबा मिळाला. मिरवणुकीसाठी होणारा खर्च वाचवून तो मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे वळविण्याचे ठरले.

उत्सवातून शेतकऱ्यांना आधार!

जगाच्या पोशिंद्याच्या कष्टावर समाजाचा उदरनिर्वाह चालतो. आज त्याच पोशिंद्यावर संकट ओढवले असताना त्याच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी नाभिक समाजाने स्वीकारली आहे. जयंतीच्या आयोजनाला सामाजिक मदतीची जोड देणाऱ्या या निर्णयाचे समाजासह विविध क्षेत्रांतून स्वागत होत आहे.

सकाळचा अभिवादन कार्यक्रम पार पाडल्यानंतर सायंकाळच्या मिरवणुकीचा खर्च मदतीसाठी राखून ठेवण्याची भूमिका समाजाने घेतली. या निर्णयात उत्सव समितीसह सर्व समाजबांधवांचा सहभाग असल्याने मदतीचा संकल्प सामूहिक ठरला आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवणारा हा उपक्रम इतर उत्सव मंडळांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.

“शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आमची जबाबदारी”

दरवर्षी जयंतीनिमित्त शोभायात्रा काढली जाते; मात्र यंदा शेतकरी दुष्काळाने होरपळला आहे. त्यामुळे मिरवणुकीचा खर्च टाळून मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे समाजभूषण दामोदरकाका बिडवे यांनी सांगितले. शेतकऱ्यांप्रती आत्मीयता बाळगणे आणि त्यांच्या संकटात साथ देणे हे समाजाचे कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!