बुलडाणा (हॅलो बुलडाणा) शेतमजूर बाजीराव किसन पवार (वय 62) सकाळी घरून निघताना त्यांनी सांगितले होते, “सोयाबीनचे दोन वावर राहिलेत, आज संपवून टाकतो.” पण संध्याकाळी ते घरी परतलेच नाहीत. परतली ती फक्त त्यांच्या मृत्यूची बातमी! ही काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे बुलडाणा तालुक्यातील शिरपूर येथील!
प्राथमिक माहितीनुसार,
गावातील कष्टकरी शेतमजूर बाजीराव किसन पवार (वय 62) वय झाले तरी कष्टाला लाजायचे नाही, हीच त्यांची ओळख. दुष्काळाने आधीच सोयाबीनचे पीक करपले होते, हातात येईल तेवढे तरी वाचवावे म्हणून ते रणरणत्या उन्हात सोयाबीन कापत होते.
दुपारचे ऊन डोक्यावर आले, अंगाची लाहीलाही होऊ लागली. घामाने चिंब भिजलेल्या बाजीरावबापूंना अचानक गरगरायला लागले आणि ते भर शेतात, त्या सोयाबीनच्या कापणीवरच कोसळले.
आरडाओरड झाली, लोक धावले, कुटुंबीयांनी त्यांना उचलून थेट जिल्हा रुग्णालयात नेले, पण नियतीने आधीच डाव साधला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून “आता काहीच नाही” असे सांगितले. एका क्षणात एका कुटुंबाचा आधार हरपला.
▪️डोळ्यात एकच प्रश्न – हा बळी कोणाचा?
उन्हाचा? दुष्काळाचा? की शेतकऱ्याच्या नशिबाचा?
शिरपूरच्या त्या शेतात सोयाबीनचे कापलेले पीक पडून आहे, पण ते कापणारे हात मात्र कायमचे थंड झाले आहेत. गावकरी हळहळत आहेत. या गरीब कुटुंबाला शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत द्यावी, एवढीच माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




Total Users : 3590035