अकोला/बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अकरा तक्रारी, तब्बल २८ ठिकाणे आणि दोनशे ते अडीचशे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा! अवैध सावकारीविरुद्धच्या धडक कारवाईने अकोल्यात खळबळ उडाली आहे. या व्यापक मोहिमेचे नेतृत्व करणारे अकोल्याचे जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे हे बुलढाण्याचे भूमिपुत्र आहेत. त्यांच्या नेतृत्वातील ही मोहीम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या सावकारीविरोधी कारवायांपैकी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अकोला, वाशीम, बुलढाणा आणि अमरावती येथील अधिकारी-कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले. मोठा फौजफाटा उतरवत तक्रारींच्या अनुषंगाने २८ ठिकाणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
कामातील पारदर्शकता, कायद्याचा अभ्यास आणि ठाम कार्यपद्धती ही साबळे यांच्या कामाची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे या कारवाईनंतर त्यांच्या प्रशासकीय भूमिकेकडे लक्ष वेधले गेले आहे. ‘महाराष्ट्रात आणखी एक तुकाराम मुंढे उदयास येत आहेत का?’ असा सवाल उपस्थित करणारा हा कारवाईचा धडाका आहे.
अवैध सावकारीविरोधात उचललेले हे पाऊल महत्त्वाचे ठरत असले, तरी कारवाईत नेमके काय आढळले, किती जप्ती झाली आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असेल, याचा अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, बुलढाण्याच्या भूमिपुत्राने अकोल्यातील या व्यापक मोहिमेतून आपल्या कामाची ठळक छाप उमटवली आहे!




Total Users : 3586414