चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शेतातील मोटारीची केबल का तोडली, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बापलेकावर चाकू आणि लोखंडी पट्टी लावलेल्या काठीने हल्ला; त्यानंतर घरात पलंगावर झोपलेल्या वृद्ध आईलाही मारहाण! सोमठाण्यात गुरुवारी, ८ ऑक्टोबरला घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचा हादरवून टाकणारा घटनाक्रम फिर्यादीतून समोर आला आहे. काल जिल्ह्यात सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने ही बातमी प्रसारित केली होती. आता एफआयआरमधून या प्रकरणाला महत्त्वाची अपडेट मिळाली आहे.
मुक्ता संजय सुरडकर यांच्या तक्रारीनुसार, सरस्वतीबाई यांनी त्यांच्या नावावरील अंदाजे तीन एकर शेती १८ जून २०२५ रोजी बक्षीसपत्राद्वारे नातू रंजितच्या नावावर केली होती. त्यानंतर दीर दीपक आणि त्याचा मुलगा जगदीश वारंवार वाद घालत व शेतातील साहित्याची नासधूस करत असल्याचा आरोप आहे.
गुरुवारी देवीच्या दर्शनाहून परतलेला रंजित मित्रांसह मोटार टाकण्यासाठी शेताकडे निघाला होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दीपकच्या घरासमोर त्याचे वडील संजय केबल घेऊन मोटारसायकल लोटताना भेटले. दीपकने मोटारीची केबल तोडल्याचे संजय यांनी सांगितल्यावर दोघे जाब विचारण्यासाठी गेले आणि वाद सुरू झाला.
तक्रारीतील आरोपानुसार, जगदीश घरातून चाकू घेऊन आला, तर दीपकने लोखंडी पट्टीची काठी उचलली. मध्यस्थीसाठी आलेल्या मित्रांना चाकू दाखवून बाजूला करण्यात आले. त्यानंतर जगदीशने संजय व रंजितवर चाकूचे वार केले आणि दीपकने काठीने मारहाण केली.
यानंतर शेती नावावर करण्यात आईचाही हात असल्याचे म्हणत दीपक सरस्वतीबाईंच्या घरात गेला व पलंगावर झोपलेल्या आईला काठीने मारहाण करून ठार केल्याचा आरोप फिर्यादीत आहे.
फिर्यादी मुक्ता घटनास्थळी उपस्थित नव्हत्या. मुलाचा मित्र निलेश सरोदे याने सांगितलेला घटनाक्रम त्यांनी पोलिसांकडे नोंदवला आहे. त्यामुळे हल्ल्याचा तपशील हा तक्रारीतील कथन असून, त्याची पडताळणी पोलीस तपासात होणार आहे.
या हल्ल्यात संजय, रंजित आणि सरस्वतीबाई यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक बातमीतील एकट्या दीपकवरील आरोपापुढे, आता एफआयआरमध्ये त्याचा मुलगा जगदीशचीही भूमिका नमूद आहे. बक्षीसपत्रावरून सुरू असलेला वाद आणि केबल तोडल्याचा जाब या पार्श्वभूमीवर तिहेरी हत्या झाल्याची तक्रार असून पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.




Total Users : 3585898