बुलढाणा (हॅलो बुलढाणा) घुमणारा ताल, रंगीबेरंगी पेहराव आणि गरब्याच्या ठेक्यावर थिरकणारी पावलं… बुलढाण्यात नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे! शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग बनलेला गरबा महोत्सव यंदा १९ व्या वर्षात पदार्पण करत असून, या जल्लोषाला पर्यावरणरक्षणाच्या संकल्पाची जोड मिळणार आहे.
बुलढाणा अर्बन, ‘हॅलो बुलढाणा’, City News आणि Bccn News यांच्या वतीने आयोजित गरबा महोत्सव २०२६ यंदा ‘SAVE NATURE’ या थीमवर रंगणार आहे. ‘जल्लोष करूया, गरब्याच्या रंगात रंगूया!’ या सादेसोबतच ‘Green Today, Brighter Tomorrow’ अर्थात आजचा हिरवा निसर्ग, उद्याचे उज्ज्वल भविष्य हा संदेश महोत्सवातून दिला जाणार आहे. उत्सवाचा आनंद घेतानाच निसर्ग वाचवण्याची जबाबदारीही स्वीकारण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गरबा येत नाही? मग ही संधी तुमच्यासाठी!
नवशिक्यांना गरब्याच्या वर्तुळात आत्मविश्वासाने उतरता यावे, यासाठी आयोजकांनी मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. बुलढाण्यातील तिरुपती मंगल कार्यालयात १ ते १० ऑक्टोबरदरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आता १० ऑक्टोबरपर्यंतची संधी उपलब्ध आहे.
नवशिक्यांपासून अनुभवी नृत्यप्रेमींपर्यंत सर्वांसाठी ही कार्यशाळा खुली असून, तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून गरब्याच्या नव्या स्टेप्स शिकता येणार आहेत. गरबा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांनी या मोफत संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
घरबसल्या पाहा गरब्याचा माहोल!
प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसले, तरी जल्लोषाचा आनंद घेता येणार आहे. संपूर्ण महोत्सव City LIVE आणि Bccn LIVE वर पाहता येणार असल्याने घराघरांत गरब्याचा रंग पोहोचणार आहे.
एकोणीसाव्या वर्षाचा उत्साह, गरब्याची रंगत आणि निसर्गरक्षणाची साद यामुळे यंदाच्या महोत्सवाची उत्सुकता वाढली आहे. स्थानिक नृत्यप्रेमींना एकत्र येण्याची, नव्या स्टेप्स शिकण्याची आणि उत्सवातून पर्यावरणाचा संदेश देण्याची संधी या आयोजनामुळे मिळणार आहे.तर मग तयार राहा बुलढाणेकरांनो… यंदा गरब्याच्या प्रत्येक ठेक्यावर जल्लोषासोबत निसर्गरक्षणाचा संदेशही घुमणार आहे!




Total Users : 3585010