बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दुष्काळाच्या तोंडावर पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा असताना बुलढाणा शहराची तहान भागविणाऱ्या येळगाव धरणातून अवैध पाणी उपसा होत असल्याचे नगर परिषदेच्या पत्रातून समोर आले आहे. या प्रकाराला लगाम घालण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी ठोस पाऊल उचलत विद्युत मोटारपंप जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य देणारी ही भूमिका कौतुकास्पद ठरली आहे.
नगर परिषदेच्या पत्रानुसार, धरणातून आसपासच्या शेतकऱ्यांकडून अवैध पाणी उपसा करण्यात येत आहे. हा उपसा रोखण्यासाठी ७ ऑक्टोबरपासून धरण तसेच आसपासच्या विहिरींमधून अवैध उपसा करणाऱ्या मोटारपंपांवर जप्तीची कारवाई करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, मुख्याधिकाऱ्यांनी केवळ सूचना देऊन विषय सोडलेला नाही. पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कामगार, अतिक्रमण आणि विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना संयुक्त कारवाईचे निर्देश देत विभागप्रमुखांमार्फत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पाणीपुरवठा अभियंता, अतिक्रमण विभागप्रमुख आणि वाहन विभागालाही मोहिमेत सहभागी होण्याच्या सूचना आहेत.
बुलढाणेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी दाखवलेली ही तत्परता स्वागतार्ह आहे. आता आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होऊन अवैध उपशाला प्रत्यक्ष आळा बसणे गरजेचे आहे. किती मोटारी जप्त झाल्या आणि उपसा किती थांबला, याचा स्पष्ट अहवाल समोर आल्यास या धडक भूमिकेचे फलितही नागरिकांना कळेल.




Total Users : 3578321