spot_img
spot_img

रात्रीच्या अंधारात शेतकऱ्याच्या घामाला आग… सोयाबीनची गंजी पेटवली कुणी? पिंपरी कोरडेत ४० हजारांचे नुकसान; कष्टाने पिकवलेल्या पिकावर अज्ञाताचा घाला!

खामगाव (हॅलो बुलढाणा) पेरणीपासून कापणीपर्यंत घाम गाळला, पीक सोंगून गंजी लावली; पण उत्पन्न हातात येण्याआधीच शेतकऱ्याच्या मेहनतीची राख झाली! खामगाव तालुक्यातील पिंपरी कोरडे शिवारात कापणी केलेल्या सोयाबीनची गंजी अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक पेटवून दिल्याची तक्रार हिवरखेड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. यात अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने म्हटले आहे.

दीपक जगदेव शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी भिकाजी पांडुरंग गवारगुरु यांच्या मालकीची गट क्रमांक ४१ मधील दोन एकर शेती ठोक्याने घेतली आहे. यंदा या शेतात तूर आणि सोयाबीनची पट्टा पद्धतीने पेरणी केली होती. सोयाबीनची कापणी करून ४ ऑक्टोबरला शेताच्या धुऱ्यावर गंजी लावण्यात आली होती.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, ६ ऑक्टोबर रोजी रात्री बारा ते पहाटे पाचच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने नुकसान करण्याच्या उद्देशाने ही गंजी पेटवली. सकाळी साडेपाचच्या सुमारास वडील जगदेव शेळके शेतात गेल्यानंतर घटना निदर्शनास आली.

आधीच शेतीचा खर्च आणि उत्पन्नाचा मेळ घालताना शेतकऱ्याची दमछाक होते; त्यात कापलेले पीक जाळण्याचा हा आरोप गंभीर आहे. शेतकऱ्याच्या कष्टावर घाला घालणारा कोण? पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास हाती घेतला असून, संबंधिताचा शोध घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी शेळके यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!