spot_img
spot_img

BIG EXCLUSIVE! सीओ साहेब, इशारा दिला होता… अखेर रात्री अकराला तोच अनर्थ घडला! कुत्र्यांचा कळप मागे लागला, दुचाकी हवेत उसळली… रस्त्यावर कोसळलेल्या तरुणालाही सोडलं नाही; हाताला घेतला चावा! ‘हॅलो बुलढाणा’च्या इशाऱ्यानंतर काय केलं? चिखलीकरांनी जीव मुठीत धरूनच फिरायचं का? नागरिकांचा संताप उफाळला; मुख्याधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी!

चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) कुत्र्यांचा पाठलाग… घाबरून वाढवलेला वेग… न दिसलेला गतिरोधक आणि दुचाकीसह रस्त्यावर आदळलेला तरुण! चिखलीतील जुन्या मेहकर रस्त्यावर यश चोपडा यांच्यासोबत घडल्याची माहिती मिळालेला प्रसंग नगर प्रशासनाच्या कार्यवाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित करीत आहे. सीओ साहेब, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तुमच्या प्राधान्यक्रमात आहे तरी कुठे?

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अकराच्या सुमारास यश चोपडा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विवेकानंद नगरातील घराकडे जात होते. जुन्या मेहकर रस्त्यावर त्यांच्या दुचाकीमागे कुत्र्यांचा कळप लागला. घाबरलेल्या चोपडा यांनी वेग वाढवला; मात्र गतिरोधक लक्षात न आल्याने दुचाकी उसळून रस्त्यावर आदळली. खाली पडलेल्या चोपडा यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला करून हाताला चावा घेतला. परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

इशारा वाचूनही प्रशासन जागे झाले नाही का?

याच रस्त्यावर कुत्र्यांच्या पाठलागामुळे दुचाकीस्वारांचा अपघात होण्याचा धोका ‘हॅलो बुलढाणा’ने दोन दिवसांपूर्वीच मांडला होता. तरीही नगर प्रशासनाने दखल घेऊन आवश्यक उपाय केले नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. आता तसाच प्रसंग घडल्याने संताप तीव्र झाला आहे.

सीओ साहेब, नागरिकांनी आधी कुत्र्यांपासून पळायचे, मग रस्त्यावर पडायचे आणि शेवटी उपचारासाठी धावायचे का? तक्रारींचे पुढे काय होते? धोकादायक ठिकाणांची पाहणी कोण करणार? नसबंदीवर लाखोंचा खर्च झाल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्ष कामाची पडताळणी आणि लसीकरणाचा तपशील जनतेसमोर का येत नाही?

खुर्चीवर बसून सुरक्षिततेचे आश्वासन पुरेसे नाही; रस्त्यावर परिणाम दिसला पाहिजे! वाढत्या श्वानसमस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांकडून मुख्याधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी होत आहे.

आनंदनगर आणि जुन्या मेहकर रस्त्याची तातडीने पाहणी, नियमानुसार श्वान नियंत्रण व लसीकरण, गतिरोधकावर स्पष्ट रंगकाम आणि तक्रारींवर निश्चित कार्यवाही आवश्यक आहे. चोपडा यांच्या घटनेबाबत प्रशासनाने केलेली कारवाई जाहीर करावी.सीओ साहेब, आणखी एखादा नागरिक रस्त्यावर कोसळण्याची वाट पाहणार आहात का?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!