खामगाव (हॅलो बुलढाणा) सोशल मीडियावर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीची देवाणघेवाण केल्याच्या आरोपावरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित मोबाईल क्रमांकाच्या धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या टिपलाइनच्या तपासणीत ही गंभीर बाब समोर आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलीस तक्रारीनुसार, महाराष्ट्र सायबर आणि बुलढाणा सायबर पोलीस यांच्याकडून प्राप्त माहितीचे विश्लेषण करण्यात आले. संबंधित टिपलाइनमध्ये बाल लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडिओ असल्याचे आढळल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर इन्स्टाग्रामवरील एका खात्यातून २५ मार्च २०२६ रोजी पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी अशा सामग्रीची देवाणघेवाण झाल्याची माहिती पुढे आली.
या डिजिटल माहितीच्या आधारे बुलढाणा सायबर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस कर्मचारी अक्षय गजानन मुंढे यांनी ६ ऑक्टोबर रोजी सरकारतर्फे तक्रार दिली. भारतीय न्याय संहिता कलम २९४(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७(ब) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
*बालकांच्या शोषणाची सामग्री प्रसारित करणाऱ्यांपर्यंत तपास पोहोचणार कधी?*
संबंधित खाते प्रत्यक्षात कोण वापरत होते आणि सामग्रीची देवाणघेवाण आणखी कुणाशी झाली, हे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. उपलब्ध तक्रारीत अटकेचा उल्लेख नाही. आरोपांची सत्यता आणि संबंधित व्यक्तीची भूमिका पोलीस तपासातून स्पष्ट होईल.




Total Users : 3572059