spot_img
spot_img

भक्तीचा जयघोष घुमणार… देऊळगाव राजा गजबजणार! ११ ऑक्टोबरपासून श्री बालाजी महाराजांचा यात्रा उत्सव; भव्य सोहळ्याच्या तयारीला वेग, प्रशासनाकडे नियोजन व परवानगीची मागणी!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) ऐतिहासिक परंपरा, भक्तांची अपार श्रद्धा आणि श्री बालाजी महाराजांच्या दर्शनाची ओढ… या त्रिवेणी संगमाने देऊळगाव राजा पुन्हा एकदा गजबजणार आहे! श्री बालाजी महाराजांच्या वार्षिक यात्रा उत्सवाला रविवार, ११ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होणार असून, धार्मिक सोहळ्यांच्या तयारीला वेग आला आहे. महाराष्ट्रासह राज्याबाहेरील भाविकही दरवर्षी श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येथे येतात.

उत्सवातील मंडपोत्सव सोमवार, १९ ऑक्टोबरलाबहोणार आहे. भाविकांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा केंद्रबिंदू असलेली दसरा पालखी मिरवणूक मंगळवार, २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बुधवार, २१ ऑक्टोबरपर्यंत निघणार आहे. लळीत उत्सव गुरुवार, २९ ऑक्टोबरला सूर्योदयी सकाळी ५:४५ वाजता साजरा होईल.

आश्विन यात्रा उत्सव ११ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर, तर कार्तिक यात्रा उत्सव १० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. या सोहळ्यांसाठी श्रींचे भक्त लगबगीने कामाला लागले असून, संस्थानकडून विविध स्तरांवर नियोजन सुरू आहे.

उत्सवाची माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी पत्रकार बंधू-भगिनींच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. बातम्या, जाहिराती, लेख आणि संकलित माहितीच्या माध्यमातून यात्रेचा प्रसार करण्याबाबत नियोजन करण्यात आले. तसेच सर्वे नंबर ९८ वरील यात्रेच्या व्यवस्थेसाठी संस्थान पुरस्कृत जागावाटप समितीच्या सदस्यांची अंतर्गत सहविचार सभाही आयोजित करण्यात आली.

श्रद्धेचा सोहळा भव्य; व्यवस्थापनाची जबाबदारीही तितकीच मोठी!

शासन परिपत्रकांनुसार यात्रेचा व्यवस्थापन आराखडा आणि प्रमाणित कार्यपद्धती अर्थात ‘एसओपी’ जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणित करावी, संबंधित विभागांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात आणि उत्सव व यात्रेला परवानगी द्यावी, अशी मागणी संस्थानने सविस्तर पत्राद्वारे केली आहे. आता या मागणीवरील प्रशासकीय कार्यवाहीकडे लक्ष असणार आहे.भाविकांनी श्री बालाजी महाराजांचे दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयंसिंह जाधव व व्यवस्थापक किशोर बीडकर यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!