चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) परवा फिरायला जाताना सहज रस्त्याला विचारलं, ‘कसं काय?’… अन् रस्ताच बोलू लागला! आपल्या अंगावरच्या जखमा दाखवत त्याने थेट सवाल केला ‘सगळ्यांचा प्रवास सुखकर करणाऱ्या माझ्याच वाट्याला वर्षानुवर्षे वेदना का?’ चिखलीत देव्हडे परिवाराने लावलेल्या अशा आशयाच्या बॅनरने आता लक्ष वेधले आहे. रस्त्याला बोलतं करून मांडलेली ही व्यथा शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
शाळेत जाणारी मुलं, कामासाठी धावणारे तरुण, शेताकडे निघालेले शेतकरी… प्रत्येकाच्या प्रवासाचा साक्षीदार असलेला रस्ता या बॅनरमधून स्वतःची कहाणी सांगतो. वाहनांचा भार सहन करायचा, पाइपलाइनसाठी पोट खोदून घ्यायचं आणि दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा डांबर ओतून घ्यायचं! पण एवढं सोसूनही अंगावरचे खड्डे कायम असतील, तर या उपचारांचा उपयोग काय, असा बोचरा प्रश्न यातून पुढे येतो.
‘आम्हाला नुसती डागडुजी नको… फक्त सलाइन लावून श्वास सुरू ठेवायचा नाही!’ या शब्दांत बॅनरने तात्पुरत्या उपायांवर बोट ठेवले आहे. वरवरची मलमपट्टी करून पुन्हा त्याच वेदना सहन करण्याऐवजी रस्त्याला कायमस्वरूपी उपचार देण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, हद्दवाढीत आलेल्या भागांची काळजी घेताना जुन्या रस्त्यांकडेही लक्ष द्या, असा संदेश यात आहे. आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी सर्वांच्या सहकार्याने बैलजोडी चौकातील इंग्रजकालीन पुलाचे पुनर्जीवन केल्याचा उल्लेख करत, या रस्त्याच्या कामासाठीही आशा व्यक्त करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्याकडूनही जुन्या कामांना न्याय मिळण्याची अपेक्षा बॅनरमध्ये मांडली आहे.
हा बॅनर रस्त्याची कहाणी सांगत नाही; तो चिखलीच्या विकासातील एका प्रश्नाला चेहरा देतो. रोज प्रवास करणाऱ्यांच्या अडचणी शब्दांत आणताना, ‘फक्त गरज आहे ती हालचालीची’ असेही स्पष्ट सांगतो. निधीसाठी मागणी पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.देव्हडे परिवाराच्या या कल्पक मांडणीतून प्रश्न मात्र धारदार उभा राहिला आहे पुलाला नवजीवन मिळालं; आता शेजारच्या रस्त्याचा नंबर कधी? रस्ता बोलला… त्याच्या हाकेला प्रतिसाद मिळणार, की पुन्हा खड्ड्यांवर डांबराची मलमपट्टी होणार?












Total Users : 3542687