spot_img
spot_img

अभिमानास्पद! लेखणीत स्वराज्याचा इतिहास… आता खांद्यावर गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची धुरा! कृष्णा सपकाळ यांची जिल्हास्तरीय समितीवर निवड; इतिहासाच्या अभ्यासाला अधिकृत जबाबदारीची मोहोर!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) इतिहास केवळ पुस्तकांत वाचायचा नाही, तर त्याच्या जिवंत साक्षीही जपायच्या! बुलढाणा जिल्ह्यातील गड-किल्ले आणि राज्य संरक्षित स्मारकांच्या संरक्षणासाठी गठित जिल्हास्तरीय समितीवर इतिहास अभ्यासक व पत्रकार कृष्णा नामदेव सपकाळ यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्वराज्याच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या सपकाळ यांच्यावर आता ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाची अधिकृत जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, उपवनसंरक्षक आणि संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या चार अशासकीय सदस्यांचा समावेश आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या २७ जानेवारी २०२६ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ही समिती गठित करण्यात आली आहे.

अतिक्रमणांचा आढावा, निष्कासनाची कार्यवाही अन् पुन्हा अतिक्रमण होऊ न देण्याची दक्षता! समितीसमोर या प्रमुख जबाबदाऱ्या असतील. संबंधित विभागांच्या समन्वयातून कार्यवाही करणे, पाडकामानंतरचा मलबा हटविणे आणि न्यायालयीन अथवा अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये आवश्यक प्रक्रिया राबविणेही कार्यकक्षेत आहे. दर तीन महिन्यांनी होणाऱ्या बैठकीत या कामांचा आढावा घेतला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशावर सपकाळ यांनी लेखन व व्याख्यानांतून सातत्याने मांडणी केली आहे. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्वत परिषदेसाठीही त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. पत्रकारितेतील योगदानासह व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.संवर्धनाच्या उपक्रमांत स्थानिक नागरिक, शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढविण्याची जबाबदारीही समितीवर आहे. त्यामुळे संरक्षणाच्या कामाला लोकसहभागाची जोड मिळण्याची अपेक्षा आहे.

 

गड-किल्ले म्हणजे दगडांच्या भिंती नव्हेत; तो आपल्या इतिहासाचा जिवंत ठेवा आहे! हा वारसा पुढील पिढ्यांसाठी टिकविण्याच्या कामात सपकाळ यांचा अभ्यास आणि अनुभव उपयोगी ठरणार आहे. आता समितीच्या माध्यमातून अतिक्रमणांना आळा आणि संवर्धनाला गती कशी मिळते, याकडे जिल्ह्याचे लक्ष असेल.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!