धामणगाव/अमरावती (हॅलो बुलढाणा/वृत्तसंस्था) नवरात्रोत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती आणायला गेलेल्या भाविकांचा परतीचा प्रवास अखेरचा ठरला! शेगावहून मूर्ती घेऊन वर्ध्याकडे निघालेल्या वाहनाला समृद्धी महामार्गावर धामणगावजवळ चॅनेल क्रमांक ९७ येथे कंटेनरने मागून धडक दिली. रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण दुर्घटनेत सात तरुण भाविकांचा मृत्यू झाल्याने वर्ध्यावर शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सातवर पोहोचला. देवीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कुटुंबांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. उत्सवाची तयारी सुरू असतानाच आलेल्या या दुर्घटनेच्या वृत्ताने आनंदाचे वातावरण शोकात बदलले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांच्या निवेदनानुसार, या अपघातात सात भाविक तरुणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
दरम्यान, सुरुवातीच्या माहितीत २१ जण गंभीर जखमी असल्याचे नमूद होते; मंत्र्यांच्या निवेदनात जखमींची संख्या १८ सांगण्यात आली आहे. त्यामुळे जखमींच्या अंतिम आकड्याबाबत अधिकृत स्पष्टता अपेक्षित आहे.मूर्ती घेऊन उत्सव साजरा करण्यासाठी निघालेल्या सात तरुणांचा प्रवास असा संपल्याने ही रात्र त्यांच्या कुटुंबीयांसाठी कायमची काळरात्र ठरली!












Total Users : 3538815