बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एकीकडे खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप, तर दुसरीकडे गाडी अडवून मारहाण आणि चाकूहल्ल्याची प्रतितक्रार! भाजप नेते ॲड. सुनील देशमुख आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर यांच्यातील वादाने बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. १ ऑक्टोबरच्या सायंकाळी घडलेल्या या घटनांप्रकरणी गुजर यांच्यासह साथीदारांवर खंडणीच्या आरोपावरून, तर देशमुख यांच्यासह साथीदारांवर हल्ल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल झाले आहेत.
‘पैसे मागितले, धमकावले अन् साखळी हिसकावली!’
देशमुख यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे मित्र अनिल बोराडे यांच्यामार्फत गुजर यांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. त्यानंतर बोलण्यासाठी बुलढाण्यात येण्यास सांगितले असता, गजानन महाराज चौकात भेट झाली.
एका दुकानात दोघांमध्ये वाद झाला. गुजर यांनी धमकी देत सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडे गेल्यास ॲट्रॉसिटी अथवा विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी गुजर आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कदम तपास करत आहेत.
‘गाडी अडवली, मारहाण केली अन् चाकू मारला!’
दुसऱ्या बाजूने गुजर यांचे सहकारी अमोल परमेश्वर यांनी वेगळी घटनाक्रमाची बाजू पोलिसांसमोर मांडली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास देशमुख यांना भेटण्यासाठी गजानन महाराज मंदिर चौकात आलो असता, त्यांनी धाड सर्कलमधील वर्चस्वाचा उल्लेख करत शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला.
तेथून निघाल्यानंतर सुमारे पंधरा मिनिटांनी राधिका हॉटेलजवळ देशमुख आणि तीन अनोळखी व्यक्तींनी गाडी अडवून मारहाण केली. आपल्याला चाकू मारला आणि गुजर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून थारमधून निघून गेल्याचे परमेश्वर यांनी तक्रारीत म्हटले आहे. जखमी परमेश्वर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वादाचे मूळ काय? तपासाकडे लक्ष!
गुजर हे आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक, तर देशमुख हे श्वेता महाले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या संघर्षाला राजकीय संदर्भही जोडला जात आहे. रात्री दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमल्याने प्रकरणाची चर्चा आणखी वाढली.
भाजपकडून मुन्ना बेंडवाल, मंदार बाहेकर आणि ॲड. मोहन पवार, तर शिवसेनेकडून ओमसिंग राजपूत, पृथ्वीराज गायकवाड आणि बबलू मावतवाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.धाडमधील दहीहंडीचा या वादाशी संबंध आहे का, की कारण वैयक्तिक आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही तक्रारींतील आरोपांची सत्यता आणि नेमका घटनाक्रम आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहे.












Total Users : 3538566