सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) “संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या घोषणा देणाऱ्या राहुल गांधी यांनी आधी स्वतःच्या पक्षाचा इतिहास तपासावा,” असा आक्रमक पलटवार भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी केला आहे. काँग्रेसने सत्तेचा गैरवापर करून मनमानी कारभार केल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसच्या घटनात्मक मूल्यांवरील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
वाघ यांनी माजी न्यायमूर्ती बहरुल इस्लाम यांच्या राजकीय आणि न्यायालयीन कारकिर्दीचा दाखला दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसने इस्लाम यांना १९६२ आणि १९६८ मध्ये राज्यसभेवर पाठवले. त्यानंतर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आणि त्यांची आसाम-नागालँड उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. पुढे ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले आणि त्यानंतर पुन्हा काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले, असे वाघ यांनी नमूद केले.
बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्याशी संबंधित पटणा अर्बन सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणातील न्यायालयीन निर्णयाचा उल्लेख करत वाघ यांनी या घटनाक्रमावर तीव्र आक्षेप घेतला. संबंधित नियुक्त्या आणि निर्णय यांचा संदर्भ देत काँग्रेसच्या सत्ताकाळातील कार्यपद्धतीवर त्यांनी निशाणा साधला.
“आपल्या सोयीने एखाद्या व्यक्तीला पदावर बसवायचे, कामे करून घ्यायची आणि पुन्हा राजकारणात आणायचे, हीच काँग्रेसची संस्कृती राहिली आहे,” असा आरोप वाघ यांनी केला. राहुल गांधी यांच्या ‘संविधान वाचवा’ आणि ‘लोकशाही वाचवा’ या घोषणांना त्यांनी “राजकीय नाटकीपणा” म्हटले.
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्यावरही वाघ यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसच्या कार्यकाळात विरोधी आवाज दडपले जात असल्याचा आरोप करत, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबावर खुलेपणाने टीका केली जाते, असे ते म्हणाले.
मग लोकशाही काँग्रेसच्या काळात होती की मोदींच्या काळात आहे? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवत वाघ यांनी राहुल गांधींकडून उत्तराची अपेक्षा व्यक्त केली.











Total Users : 3536208