spot_img
spot_img

EXCLUSIVE | जिल्हाधिकाऱ्यांचा DJ बंदी आदेश धाब्यावर? जामोदच्या विसर्जनात रात्रीपर्यंत DJ दणाणला; नाशिकच्या वाहनधारकावर गुन्हा!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट प्रतिबंधात्मक आदेशानंतरही गणेश विसर्जन मिरवणुकीत DJ वाजवल्याचा प्रकार जामोद येथे समोर आला असून, याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील एका वाहनधारकाविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नियम मोडून DJ वाजविणाऱ्यांना पोलिसांनी थेट इशाराच दिल्याची चर्चा आहे.

पोलिसांच्या फिर्यादीनुसार, बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी 16 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अंतर्गत आदेश काढून डॉल्बी साऊंड, टॉप-मिड-बेस मल्टीस्पीकर सिस्टीम तसेच अशा साऊंड सिस्टीम वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या वापरावर 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत प्रतिबंध घातला आहे.

मात्र, 26 सप्टेंबर रोजी जामोद येथे सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान MH-41-BX-0027 क्रमांकाच्या वाहनावर बँडसोबत DJ वाजविण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेदरम्यान हा प्रकार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या वाहनाचा ताबा अतुल पांडुरंग गोरे (वय 42, रा. सटाणा, जि. नाशिक) यांच्याकडे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशासोबतच जळगाव जामोद पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 168 अंतर्गत दिलेल्या नोटिशीचेही उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी पोहेकॉ निलेश रामदास पुंडे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आली. DJ बंदीच्या काळात झालेल्या या कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकांमध्ये नियमभंग करणाऱ्यांवर पोलीस आता अधिक कडक कारवाई करणार का, याकडे लक्ष लागले आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!