बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार श्वेता महाले आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच पांगरी-हातेडी रस्त्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा शाब्दिक तोफा धडाडल्या. विशेष म्हणजे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनीही नाव न घेता असा टोला लगावला की कार्यक्रमस्थळी एकच राजकीय चर्चा रंगली!
पांगरी-हातेडी रस्त्याचे काम झाल्यानंतर गावकऱ्यांनी आमदार श्वेता महाले यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना विजयराज शिंदे म्हणाले, “मी ताई येण्याच्या अर्धा तास आधी गावात आलो. प्रत्येक जण म्हणत होता रस्त्याचे काम एक नंबर झाले. मी ठेकेदार कोण विचारले तर दंडे नाव सांगितले. मी म्हटलं, जावई असता तर एवढं चांगलं काम झालं नसतं; जावई कसे काम करतात हे बुलढाणा मतदारसंघात आम्हाला चांगलं माहिती आहे!” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
यानंतर आमदार श्वेता महाले यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली. पांगरी ते हातेडी आठ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराला बोलावून “वेगळ्या पद्धतीची मागणी” करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र संबंधित ठेकेदार दबावाला बळी पडला नाही आणि अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम केल्याचा दावा महाले यांनी केला.
“आमच्यावर संस्कार आहेत दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा आधी स्वतःचं घर सांभाळायचं,” असा टोला लगावत त्यांनी, “हातेडीतच नाही तर संपूर्ण बुलढाणा विधानसभा मतदारसंघात हुकूमशाही आणि दमदाटी चालू देणार नाही,” असेही म्हटले.
महाले यांनी यावेळी आणखी गंभीर आरोप करत विजूभाऊंच्या पत्नीला “उचलून नेऊ, गायब करू” असा निरोप पाठवण्यात आल्याचा दावा केला. या आरोपासंदर्भात संबंधित बाजूची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
“आज बुलढाण्याचा बिहार झालाय असं लोक म्हणतात; हा बिहार पुन्हा शांततेचा बुलढाणा करायचा आहे,” असे म्हणत महाले यांनी शिवराळ भाषा, धमक्या आणि दबावाच्या राजकारणावर टीका केली.
त्यांनी बांधकाम कामगारांच्या पेट्यांसाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांची मागणी होत असल्याचाही आरोप केला. तसेच काही व्यक्तींनी ठेकेदारीतून कोट्यवधींची कमाई केल्याचा सवाल उपस्थित केला.
“आमदारांच्या माध्यमातून रस्ते, नळयोजना, शाळांचा विकास झाला पाहिजे. खरी ताकद जनता आहे; कोण कुठून निवडणूक लढवणार हे कोणाच्या घरातून नाही, जनता ठरवेल,” असे महाले यांनी ठणकावले. पांगरी-हातेडीचा रस्ता निमित्त ठरला असला तरी या भाषणामुळे बुलढाण्यातील राजकीय संघर्षाचा नवा अध्याय पुन्हा उघडल्याचे स्पष्ट झाले आहे











Total Users : 3522702