सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) एकीकडे दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे उत्सवात लाखोंची उधळपट्टी कशाला? हा प्रश्न कृतीतून विचारत मलकापूर पांग्रा गावाने यंदाच्या गणेश विसर्जनात आदर्श घालून दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील पाचही गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत शांततेत, साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत गणरायाला निरोप दिला.
आज शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी गावातील विसर्जन सोहळा पार पडला. श्री साई एकता गणेश मंडळाने टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय मिरवणूक काढत सामाजिक एकता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. या मंडळाला यापूर्वी बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडून गौरविण्यात आले आहे.
मात्र शिवशक्ती गणेश मंडळाने आणखी एक पाऊल पुढे टाकले. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मिरवणूकच न काढण्याचा निर्णय घेत, त्यावरील खर्च जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी आणि वृक्षारोपणासाठी वापरण्याचा संकल्प केला. ‘उत्सवापेक्षा समाज मोठा’ हा संदेश या निर्णयातून देण्यात आला.
नवयुवक गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ आणि श्री गणेश मंडळ धनगरपुरा यांनीही कोणताही गाजावाजा न करता साध्या पद्धतीने विसर्जन केले.
साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार युवराज रबडे यांनी शांतता समितीच्या बैठकीत डीजेमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन केले होते. त्याला गावकऱ्यांनी अक्षरशः कृतीतून उत्तर दिले.विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी दुय्यम ठाणेदार संदीप मेधने, बीट जामदार निवृत्ती पोफळे यांच्यासह पोलीस कर्मचारी तैनात होते











Total Users : 3510899