spot_img
spot_img

जळगाव जामोदात ‘होंडा शाइन’चा धक्कादायक किस्सा! पेट्रोल टाकीत साप शिरला अन् पाहता पाहता जमली गर्दी!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) दुचाकीच्या पेट्रोल टाकीत पेट्रोल असते, पण चक्क सापच आढळल्याने जळगाव जामोद शहरात एकच खळबळ उडाली! नगरपालिकेच्या समोर उभ्या असलेल्या होंडा शाइन दुचाकीच्या पेट्रोल टाकीत साप शिरल्याचे निदर्शनास येताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. नेमका साप टाकीत गेला कसा? या प्रश्नाने उपस्थितांमध्ये कुतूहल आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दुचाकीच्या पेट्रोल टाकीत साप असल्याचे लक्षात येताच उपस्थित ॲड. रतन इंगळे यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसिद्ध सर्पमित्र शरद जाधव यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच शरद जाधव तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

साप पेट्रोल टाकीत अडकल्याने त्याला बाहेर काढणे हे मोठे आव्हान होते. मात्र, परिस्थितीचा अंदाज घेत शरद जाधव यांनी अत्यंत सावधगिरीने दुचाकीची पेट्रोल टाकी उघडली आणि सापाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर काढले.

सापाची पाहणी केल्यानंतर तो ‘रुक्का’ जातीचा आणि बिनविषारी असल्याची माहिती सर्पमित्र शरद जाधव यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. विशेष म्हणजे, रेस्क्यूदरम्यान सापाला कोणतीही इजा होऊ न देता त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या अनोख्या घटनेमुळे काही काळ नगरपालिकेसमोरील परिसरात ‘होंडा शाइनच्या टाकीत साप’हीच चर्चा रंगली होती.

सर्पमित्र शरद जाधव यांच्या तत्परतेमुळे एका जीवाला जीवदान मिळाले. साप आढळल्यास घाबरून जाऊ नये, त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधून सापाचा सुरक्षित रेस्क्यू करावा, असे आवाहन करण्यात आले आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!