बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली असून, आज संपूर्ण बुलढाणा जिल्हा विसर्जन मिरवणुकांसाठी सज्ज झाला आहे. उत्साहाच्या या सोहळ्याला गालबोट लागू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी बुलढाणा पोलिसांनी तब्बल २ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह होमगार्डचा तगडा बंदोबस्त उभा केला आहे. संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची विशेष करडी नजर राहणार आहे.
जिल्ह्यातील २ हजार ६६ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण पोलीस दलातील तब्बल ७० टक्के मनुष्यबळ विसर्जन बंदोबस्तासाठी मैदानात राहणार आहे.
संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मार्गांवर सीसीटीव्हीची नजर राहणार असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी १० स्ट्रायकिंग फोर्स, ४ आरसीपी आणि १ क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले आहे. बाहेरील जिल्ह्यांतूनही अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. यात १ डीवायएसपी, २ पीआय, एसआरपीएफची १ कंपनी व १ प्लाटून, २७ कॅडेट पीएसआय, २४० प्रशिक्षणार्थी पोलीस आणि १,४४३ होमगार्ड यांचा समावेश आहे.
दोन अपर एसपींकडे थेट जबाबदारी!
खामगाव प्रभागाची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, तर बुलढाणा प्रभागाची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड सांभाळणार आहेत. विसर्जन मार्गांवर रूट मार्च तसेच दंगा काबू योजनेची रंगीत तालीम यापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे.
‘डीजे मुक्त’ उत्सवाचा संदेश!
जिल्ह्यात शहरी ५२१, ग्रामीण १,२५९ आणि ‘एक गाव एक गणपती’ अंतर्गत २८६, अशा एकूण २,०६६ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सवाचे आवाहन केले आहे. नियमांचे पालन करून सामाजिक व पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना ‘पोलीस मित्र गणराया पुरस्कार’ देण्यात येणार आहे.











Total Users : 3509188