सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) पाऊस गायब… पिके करपली… शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर खरीप हंगाम उद्ध्वस्त होत असताना आता संताप रस्त्यावर उतरला आहे! संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करा, पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून भरघोस नुकसानभरपाई द्या आणि शेतकऱ्यांना १०० टक्के पीकविमा मंजूर करा, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने बुधवारी सिंदखेडराजात जोरदार आंदोलन केले.
तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी केवळ घोषणाबाजीवर न थांबता रस्ता रोको आणि अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. “शेतकरी उद्ध्वस्त झाला, आता मदत कधी?” असा सवाल उपस्थित करत कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, पावसातील दीर्घ खंडामुळे सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. केवळ कागदी अहवाल नकोत; अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसान पाहावे, वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि दुष्काळी मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.
यानंतर तहसीलदार अजित दिवटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, दिनकरराव देशमुख, रियाज खान पठाण, राजेंद्र इंगळे, मन्नान पठाण, सतीश भुतेकर, विजय तायडे, नगराध्यक्ष सौरभ तायडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका; ठोस मदत जाहीर झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू,” असा इशाराही आंदोलकांनी दिला. त्यामुळे काही काळ तहसील परिसरातील वातावरण चांगलेच तापले होते











Total Users : 3505797