चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) कालपर्यंत मुंबईत भाजप प्रवेशाची तयारी… आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाची चर्चा… आणि रात्री अचानक दिल्लीकडे कूच! चिखलीचे माजी आमदार तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या राजकीय प्रवासाने अवघ्या काही तासांत जबरदस्त कलाटणी घेतली आहे.
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राहुल बोंद्रे यांच्याशी थेट फोनवरून संवाद साधल्यानंतर प्रस्तावित भाजप प्रवेशाला ब्रेक लागल्याचे वृत्त समोर आले आहे. विविध माध्यमांनीही बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मागे घेतल्याचे वृत्त दिले आहे.
या संवादानंतर राहुल गांधी यांनी बोंद्रे यांना दिल्ली येथे भेटीसाठी बोलावल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, राहुलभाऊ बोंद्रे हे काल रात्रीच तातडीने दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती ‘हॅलो बुलढाणा’ला मिळाली आहे.
राहुल गांधी आणि बोंद्रे यांच्यातील फोन संभाषणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चिखलीच्या राजकारणात अक्षरशः खळबळ उडाली. संवादादरम्यान बोंद्रे भावनिक झाल्याचे दिसून आले. पराभवाने खचून न जाता संघर्ष सुरू ठेवण्याचा संदेश राहुल गांधी यांनी दिल्याचे या संवादातून समोर आले.
विशेष म्हणजे, आज २२ सप्टेंबर रोजी मुंबईत राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा होती. प्रवेशाच्या पूर्वसंध्येलाच राहुल गांधी यांचा फोन आला आणि त्यानंतर सर्व राजकीय गणितेच उलटली. रात्री बोंद्रे यांच्या निवासस्थानाबाहेर शेकडो समर्थक जमा झाले. “राहुलभाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दिल्लीतील भेटीत नेमके काय ठरणार? काँग्रेसमध्ये राहुल बोंद्रे यांना नवी जबाबदारी मिळणार का? आणि काही तासांपूर्वीपर्यंत जवळपास निश्चित मानला जाणारा भाजप प्रवेश कायमचा रद्द झाला आहे का?
राहुल बोंद्रे यांची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार असले, तरी मुंबईकडे निघालेली राजकीय वाट सध्या दिल्लीकडे वळल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
‘हॅलो बुलढाणा’चे लक्ष आता दिल्लीकडे!
राहुल गांधी-राहुल बोंद्रे प्रत्यक्ष भेटीनंतर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











Total Users : 3498587