spot_img
spot_img

कधी कोसळेल याचा नेम नव्हता… साखरखेर्ड्यात अखेर हलले प्रशासन! दगडी मज्जिदसमोरील ‘तो’ धोकादायक पोल हटविला

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) येथील जय संताजी नगरमध्ये दगडी मज्जिदसमोर मुख्य रहदारीच्या मार्गावर अनेक दिवसांपासून अक्षरशः अपघाताला निमंत्रण देत उभा असलेला धोकादायक विद्युत पोल अखेर हटविण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गजानन इंगळे यांनी सातत्याने केलेल्या मागणीची दखल घेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आणि सरपंच अमित जाधव यांच्या पुढाकाराने वाकलेला पोल काढून त्याजागी नवीन लोखंडी पोल उभारला.

 

दगडी मज्जिदसमोरील हा रस्ता साखरखेर्ड्यातील वर्दळीच्या भागांपैकी एक आहे. दिवसभर शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दुचाकी व चारचाकी वाहनांची येथे मोठी ये-जा असते. मात्र रस्त्याकडे धोकादायक पद्धतीने झुकलेला विद्युत पोल कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती नागरिक व्यक्त करीत होते. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवालही उपस्थित होत होता.

याच पार्श्वभूमीवर गजानन इंगळे यांनी संबंधित प्रशासन आणि महावितरणकडे पोल तातडीने हटविण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जुना धोकादायक पोल हटवून नवीन पोल बसविण्यात आला आहे.

विशेष म्हणजे गावातील इतर काही ठिकाणी वाकलेल्या विद्युत पोलांचीही पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पोल उभारण्याचे काम करण्यात आले.

या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, “वेळीच दखल घेतली म्हणून संभाव्य मोठी दुर्घटना टळली” अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा तक्रारींवर प्रशासनाने पुढेही तातडीने कृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!