संग्रामपूर (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) पावसाने दीड महिन्यापासून पाठ फिरवली… शेंगांना दाणे भरले नाहीत… हजारो रुपयांचा खर्च मातीत गेला आणि अखेर शेतकऱ्याने उभ्या पिकावरच रोटावेटर फिरवला! संग्रामपूर तालुक्यातील काकोडा येथील गणेश मानखैर यांनी तब्बल २० एकर सोयाबीन उद्ध्वस्त करत शासन व्यवस्थेचे लक्ष वेधण्यासाठी चक्क ‘कार्यक्रम पत्रिका’ छापल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.
काकोडा शिवारातील गट क्रमांक ५८ व १०० मधील सोयाबीन पिकाची पावसाअभावी वाढ खुंटली होती. शेंगा न भरल्याने उत्पादनाची आशाच संपुष्टात आली. बियाणे, खत, मशागत आणि मजुरीचा खर्चही निघणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रविवारी, २० सप्टेंबर रोजी मानखैर यांनी उभ्या सोयाबीनवर रोटावेटर फिरवला. तर विनायक तुळशीराम मानखैर यांनी एक हेक्टर सोयाबीनमध्ये गुरे सोडली.
या संतापाला वेगळी धार देत शेतकऱ्याने ‘सोयाबीन पिकात रोटावेटर मारण्याचा कार्यक्रम’ अशी उपरोधिक पत्रिका तयार केली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘शुभहस्ते’ आणि उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘प्रमुख उपस्थिती’ असा उल्लेख करण्यात आला
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काकोडा येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. सपकाळ यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी सार्वजनिकरीत्या केली आहे.












Total Users : 3485960