जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील खेर्डा ते चांगेफळ मार्गावर रविवारी, दि. २० सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास अचानक बाबुळीचे मोठे झाड भररस्त्यात कोसळल्याने वाहतुकीचा अक्षरशः खोळंबा झाला. सुदैवाने झाड कोसळत असताना रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, अचानक रस्ता बंद झाल्यामुळे वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
खेर्डा-चांगेफळ मार्गाच्या दुतर्फा अनेक जुनी, जीर्ण आणि धोकादायक झाडे उभी असून काही झाडे थेट रस्त्याच्या दिशेने झुकलेली आहेत. वादळी वारा, पाऊस किंवा मातीचा आधार कमकुवत झाल्यास ही झाडे कधीही कोसळण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रविवारच्या घटनेने या धोक्याची प्रत्यक्ष झलकच दाखवून दिली.
एखाद्याचा जीव गेल्यानंतरच संबंधित यंत्रणा जागी होणार का? असा संतप्त सवाल आता वाहनचालक व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ झाड कोसळल्यानंतर घटनास्थळी धाव घेण्यापेक्षा संपूर्ण मार्गाची तातडीने पाहणी करावी. रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांचा पंचनामा करून जीर्ण झाडे, रस्त्याकडे झुकलेल्या फांद्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडे तातडीने छाटावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.
आजची घटना कोणतीही जीवितहानी न होता निभावली असली, तरी पुढच्या वेळी नशिबाची साथ मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने जागे व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.












Total Users : 3483557