spot_img
spot_img

EXCLUSIVE! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दडला होता इतिहास; ३७ वर्षांपूर्वीच्या फोटोने शोधली गरुड मूर्ती! इतिहास बेवारस कसा झाला? सिंदखेडराजात कचऱ्याजवळ सापडली दुर्मिळ गरुड मूर्ती!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या ऐतिहासिक वैभवाला साक्ष देणारी एक महत्त्वाची गरुड मूर्ती तब्बल तीन दशकांहून अधिक काळ विस्मृतीत गेल्यानंतर पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ऐतिहासिक नोंदीत स्थान असलेली ही मूर्ती शासकीय वाडा परिसरात चक्क कचऱ्याच्या ढिगाजवळ, पत्र्याच्या शेडलगत बेवारस अवस्थेत आढळून आली!

आर. सी. अग्रवाल यांच्या १९८९ मध्ये प्रकाशित Archaeological Remains in Western India या पुस्तकात या गरुड मूर्तीचे छायाचित्रासह दस्तऐवजीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर प्रत्यक्ष मूर्ती कुठे गायब झाली, याचा ठावठिकाणा नव्हता.

इतिहास अभ्यासक व लेखक सुमित सुभाष खांदवे आणि मयुरेश अतुल खेकाळे यांनी २०२२ मध्ये जुन्या छायाचित्राचा धागा पकडत शोधमोहीम हाती घेतली. ऐतिहासिक संदर्भ, स्थानिक माहिती आणि प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे अखेर ही मूर्ती शासकीय वाडा परिसरात सापडली.

३०.५ इंच उंच, १५ इंच रुंद आणि १० इंच जाडीची ही मूर्ती सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. उपसंचालक मयुरेश खडके यांच्या सूचनेनंतर कर्मचारी धीरज हांडे यांनी मूर्ती ताब्यात घेतली. सध्या श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव यांच्या राजवाड्यातील नगारखान्यात ही ऐतिहासिक मूर्ती दर्शनी ठिकाणी ठेवण्यात आली आहे. पर्यटकांनाही आता तिचे दर्शन घेता येणार आहे

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!