सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, पिंपळगाव सोनारा आणि बाळसमुद्र परिसरात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर अक्षरशः संकट कोसळले आहे. वर्षभर कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर वाळले, शेंगा लागल्या; मात्र शेंगांमध्ये दाणेच भरले नाहीत. अखेर हताश झालेल्या काही शेतकऱ्यांनी वाळलेले सोयाबीन पेटवून आपला संताप व्यक्त केला.
शेतकरी योद्धा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. हिवरखेड पूर्णा येथील शेतकरी संदीप चव्हाण यांच्या शेतातील सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे अत्यंत बारीक आणि अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनीही प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली.
पिंपळगाव सोनारा व बाळसमुद्र येथे शेतकऱ्यांनी वाळलेले पीक उपटून समितीसमोर ठेवले. कर्ज काढून केलेली मशागत, महागडे बियाणे, खते, औषधे आणि महिनोनमहिने घेतलेली मेहनत एका झटक्यात मातीत गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात प्रचंड संताप आहे.
“स्वतःच्या हाताने शेतकऱ्याला पीक जाळावे लागत असेल, तर सरकारला आणखी कोणता पुरावा हवा?” असा थेट सवाल शेतकरी योद्धा कृती समितीने उपस्थित केला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, या मागणीसाठी उद्या सिंदखेडराजा तहसील कार्यालयात मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले जाणार आहे












Total Users : 3485041