spot_img
spot_img

BIG BREAKING! ठरलं! 22 सप्टेंबरला माजी आमदार राहुल बोंद्रे भाजपात! दीड महिन्यापूर्वी ‘हॅलो बुलढाणा’ने दिले होते संकेत; आता मुंबईत होणार ‘मेगा एन्ट्री’! बोंद्रेंसोबत चिखली काँग्रेसमधील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची फौजही भाजपच्या वाटेवर?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखलीच्या राजकारणात दीड महिन्यापासून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब होण्याची वेळ आली आहे! काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश 22 सप्टेंबरला मुंबईत होणार असल्याची पक्की माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत हा प्रवेश होण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. स्वतंत्र वृत्तांतही 22 सप्टेंबरच्या सायंकाळी मुंबईत प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

बोंद्रे एकटेच जाणार नसल्याची चर्चा आता चिखलीच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक रंगली आहे. चिखली नगरपालिकेतील काही आजी/माजी नगरसेवक, तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, युवक काँग्रेस तसेच विविध सेलचे पदाधिकारी, ग्रामीण भागातील सरपंच आणि कार्यकर्त्यांचा मोठा गट त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, ‘हॅलो बुलढाणा’ने दीड महिन्यापूर्वीच या राजकीय भूकंपाचे संकेत वाचकांपर्यंत पोहोचवले होते!मुंबईत बंद दाराआड झालेल्या कथित बैठकीनंतर बोंद्रे समर्थकांसह झेंडा बदलणार का, असा सवाल आम्ही उपस्थित केला होता. त्यावेळी ‘हॅलो बुलढाणा’शी बोलताना राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत “नेहमीसारखी अफवा आहे” अशी प्रतिक्रिया दिली होती.

पण आता राजकीय चक्र वेगाने फिरले आहे!

बोंद्रे यांनी समर्थकांसाठी व्यक्त केलेल्या भावनिक संदेशानेही या घडामोडींना वेगळी धार दिली. “पुढे परिस्थिती कोणतीही असो, आपल्यातले नातं व विश्वास कायम राहावा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या महिन्यातही त्यांच्या समर्थकांच्या भेटीगाठींमुळे संभाव्य पक्षबदलाच्या चर्चांना जोर आला होता.

राहुल बोंद्रे यांनी 2009 आणि 2014 मध्ये चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, तर 2024 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. आता 22 सप्टेंबरकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दीड महिन्यापूर्वी ‘अफवा’ म्हणून सुरू झालेली चर्चा आता थेट पक्षप्रवेशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे!

माजी आमदार राहुल बोंद्रे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी ‘हॅलो बुलढाणा’ परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!